म्हापशात नगरसेवकांची गोची
By admin | Published: August 29, 2015 02:43 AM2015-08-29T02:43:55+5:302015-08-29T02:47:30+5:30
म्हापसा : पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.
म्हापसा : पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. प्रभाग फेररचनेवरून काही नगरसेवकांची गोची झाल्याने सध्या काही विद्यमान नगरसेवक नव्या प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. विद्यमान नगरसेवकांतील काहींचे पत्ते कट होण्याच्या मार्गावर आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट
होणार आहे.
आॅक्टोबर २५ रोजी पालिका निवडणूक आहे. म्हापसा पालिकेचे प्रभाग १५ वरून २० केले आहेत. प्रभाग वाढवल्यानंतर प्रभाग फेररचनेचे कामही पूर्ण करून ते जाहीर केले आहे. लवकरच आरक्षणही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात
येणार आहे.
प्रभाग फेररचनेनंतर विद्यमान नगरसेवकांवर प्रभाग बदलून नव्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे. काही प्रभागांची फेररचना अशा पद्धतीने केली आहे,
की त्यामुळे विद्यमान नगरसेवकांतील काही नगरसेवकांना कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवावी हा प्रश्न पडला आहे.
प्रभाग १ कुचेली, प्रभाग २ धुळेर व प्रभाग ३ करासवाडा यात जास्त प्रमाणावर मतदार असल्याने त्याची विभागणी केली आहे. येथे दोन नवीन प्रभाग तयार केले आहेत. प्रभाग २ मधील नगरसेवक अॅड. सुभाष नार्वेकर यांच्या प्रभागाची विभागणी तीन प्रभागांत केल्याने कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. तशीच परिस्थिती प्रभाग तीनमधील नगरसेवक मायकल कोरास्को यांची झाली आहे. त्यांच्या प्रभागाची विभागणी झाल्याने तसेच सुभाष नार्वेकर यांच्या प्रभागातील काही भाग त्यांच्या प्रभागात आल्याने त्यांच्यासमोरही प्रश्नचिन्ह उभे आहे.
प्रभाग पाचमधील नगरसेवक सुभाष कळंगुटकर यांनीही आपल्या विद्यमान प्रभागाबाबत विचार सुरू केला आहे. प्रभाग ११ या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आलेले आंतोनियो आल्वारीस यांचे भवितव्य कोणता प्रभाग आरक्षित होणार आहे यावर अवलंबून आहे. निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते आपले भवितव्य ठरवण्याची शक्यता आहे.
प्रभाग सातमधील नगरसेवक दीपक म्हाडेश्री व प्रभाग ९ मधील नगरसेवक आशिष शिरोडकर आपआपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
प्रभाग १२ मधून निवडून आलेल्या विद्यमान उपनगराध्यक्षा विजेता नाईक यांना भाजपा पॅनलकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच प्रभाग १३ तील नगरसेवक गुरुदास वायंगणकर यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने तेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. २०१२ साली भाजपाचा पाठिंबा या नगरसेवकांनी नाकारला व काँग्रेसप्रणीत नगरसेवकाला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याने त्यांचे पत्ते कट होणार आहेत. सध्याच्या नगरसेविका रुही पत्रे यांच्या सध्याच्या प्रभागातील काही भाग वगळला आहे. त्यामुळे त्या माघार घेण्याची शक्यता असून या प्रभागातून उदय नार्वेकर यांचे नाव भाजपा गटातून चर्चेत आहे.
मागील निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातील विजयी इल्मा ब्रागांझा या निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्या जागी त्याच प्रभागातून त्यांचे पुत्र रायन ब्रागांझा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच प्रभाग १४ मधील नगरसेविका मनीषा कवळेकर यांच्या जागी त्यांचे पती रोहन कवळेकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
विद्यमान नगरसेवकांतील काही नगरसेवक प्रभाग बदलणार आहेत. प्रभाग ४ मधील नगरसेविका मर्लिन डिसोझा या प्रभाग ८ मधून निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग ६ मधून निवडून आलेल्या नगराध्यक्षा रूपा भक्ता प्रभाग ११ मधून लढणार आहेत. माजी नगराध्यक्ष संदीप फळारी प्रभाग १२ मधून तर प्रभाग १५ मधून निवडून आलेले सुधीर कांदोळकर प्रभाग १९ मधून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपा गटाने प्रभाग दोनमधील उमेदवाराचे नाव निश्चित केले नसले तरी दोन नावे या प्रभागात चर्चेत आहेत. यात आनंद भाईडकर व प्रभाकर वेर्णेकर यांचा समावेश आहे. म्हापसा कोमुनिदादचे खजिनदार मार्टीन कारास्को प्रभाग तीनमध्ये भाजपाचे उमेदवार असतील. प्रभाग चारमध्ये सुशांत हरमलकर, प्रभाग पाच मॅगी मयेकर, प्रभाग सहा संजय मिशाळ, प्रभाग ७ मधून हळदोणा भाजपा मंडळाचे अध्यक्ष फ्रॅन्की कार्व्हालो, प्रभाग १० तुषार टोपले, प्रभाग १३ जोसुवा डिसोझा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग १४ साठी दामोदर लांजेकर, प्रभाग १५ साठी स्वप्नील शिरोडकर व प्रभाग १६ साठी राजसिंग राणे यांच्या नावाची चर्चा असली तरी राजसिंग राणे यांचे नाव सोडल्यास प्रभाग १४ व १५ साठी विश्वास साळगावकर व दामू लांजेकर यांचे नाव पुढे आल्याने यातील कोणालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रभाग १८ साठी रोहन कवळेकर व प्रभाग २० साठी चित्रा मणेरकर यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले
आहे.