गोव्यात पालिका निवडणुका एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:15 PM2021-01-18T19:15:51+5:302021-01-18T19:16:16+5:30
Municipal elections in Goa : एप्रिलपर्यंत आम्ही निवडणुका घेणे पुढे ढकलत आहोत असे निवडणूक आयोगाने जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
पणजी : राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका आणखी तीन महिन्यांनी म्हणजे एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी तसे जाहीर केले. परिणामी पणजी महापालिकेसह अन्य पालिकांच्याही निवडणुका एप्रिलमध्ये होतील.
जानेवारी व फेब्रुवारीच्या कालावधीत विविध सरकारी अधिकारी (उपजिल्हाधिकारी, मामोदार वगैरे) कोविड लसीकरणाच्या मोहिमेत जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम करतील. अशावेळी पालिकांच्या निवडणुका घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकू पाहत नाही व त्यामुळेच निवडणुका तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी जाहीर केले आहे. तशी अधिसूचना त्यांनी जारी केली आहे.
साखळी व फोंडा वगळता अन्य सर्व नगरपालिकांची मुदत संपलेली आहे. जिल्हा पंचायत निवडणुका निवडणूक आयोगाने कोविड संकट काळात घेतल्या. मात्र त्या देखील उशिराच पार पडल्या. पालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतील असे सर्वांनाच वाटले होते. मात्र ते शक्य नाही हे सोमवारी स्पष्ट झाले. एप्रिलपर्यंत आम्ही निवडणुका घेणे पुढे ढकलत आहोत असे निवडणूक आयोगाने जाहीर करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
एक तर एप्रिलमध्ये निवडणुका किंवा आम्ही ठरवू त्या तारखेला निवडणुका होतील असे आयोगाने म्हटले आहे. निवडणुका पुढे ढकलताना आयोगाने दिलेले कारण पटण्यासारखे आहे. मात्र अनेक पालिकांची प्रभाग फेररचना तसेच आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून महिन्याभराचा कालावधी जाणार आहे. पणजी महापालिकेची मुदत मार्च महिन्यात संपते. अन्य पालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे, त्यात डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे काकोडा, काणकोण, मडगाव, मुरगाव, पेडणे, केपे, सांगे व वाळपई या पालिकांचा समावेश होतो. पालिका निवडणुकांसोबतच जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे.