महापालिका पीपल्स फ्रेंडली बनवणार; महापौर उदय मडकईकर यांची घोषणा    

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:26 AM2020-03-12T11:26:27+5:302020-03-12T11:26:56+5:30

आगामी निवडणुकीत बाबूश यांचे महापालिकेच्या सर्व ३० ही जागा पादाक्रांत करण्याचे स्वप्न पूर्ण करावे लागणार आहे.

The municipality will make the people friendly | महापालिका पीपल्स फ्रेंडली बनवणार; महापौर उदय मडकईकर यांची घोषणा    

महापालिका पीपल्स फ्रेंडली बनवणार; महापौर उदय मडकईकर यांची घोषणा    

Next

किशोर कुबल

पणजी : महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महापौरपदाचा मुकुट पुन्हा एकदा उदय मडकईकर यांच्या डोक्यावर चढविला आहे. मडकईकर यांची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. पुढील वर्षभरात अधिकाधिक लोकाभिमुख होऊन आगामी निवडणुकीत बाबूश यांचे महापालिकेच्या सर्व ३० ही जागा पादाक्रांत करण्याचे स्वप्न पूर्ण करावे लागणार आहे. एका अर्थाने हे एक मोठे आव्हानच मडकईकर यांच्यासमोर आहे. महापौरपदाचा दुसऱ्यांदा कार्यकाळ सांभाळणार असलेले मडकईकर यांच्याशी केलेली बातचीत...

  • आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व ३० ही जागा जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. यासाठी पुढील वर्षभरात महापौर म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे?

- महापौरपदाच्या आजवरच्या कारकिर्दीत लोकांची कामे सहज आणि सुलभ पद्धतीने करून देण्यासाठी नेहमीच माझा कटाक्ष राहिलेला आहे. लोकांना काय हवे, काय नको याची जाणीव मला आहे. लोकांच्या भावनांची नेहमीच मी कदर केलेली आहे. शहरात जेथे म्हणून रस्ते, पदपथ, पथदीप यांची आवश्यकता आहे तेथे वेळोवेळी ते दिलेले आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे. हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. शहर स्वच्छ राहावे म्हणून माझा नेहमीच आटापिटा असतो आणि गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत हळूहळू हे मी सिद्ध केले आहे. मी ताबा घेण्यापूर्वी कांपाल येथील परेड मैदानाची स्थिती काय होती तुम्हाला माहित आहे. आज परेड मैदानावर जाऊन पहा, तेथील कचरा दूर झालेला आहे. तरुण मुले खेळताना दिसत आहेत. शहरातील उद्यानांची दुर्दशा झाली होती ती सुधारून घेतली.

  • वर्षभराचा कार्यकाळ हा तसा खूपच अल्प ,गेल्या कारकिर्दीत तुमची बरीच कामे अपूर्ण राहिली असतील ती तुम्ही कशी पुढे नेणार आहात?

-तुम्ही बरोबर बोललात. वर्षभराचा काळ अगदीच अल्प आहे. गेल्यावेळी महापौर म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिले तीन महिने निवडणूक आचारसंहितेत वाया गेले. त्यामुळे कोणतीच कामे होऊ शकली नाहीत. परंतु यावेळी मात्र संधी आहे. महापालिका लोकाभिमुख करणार आहे. लोकांना हवे असलेले निवास दाखले, उत्पन्नाचे दाखले यासाठी दहा-बारा दिवस लागतात. लोकांना हेलपाटे घालावे लागतात. हे चित्र बदलणार आहे. लोकांना दोन दिवसात त्यांचे दाखले मिळायला हवेत, यादृष्टीने कालबद्ध सेवा सुरू करणार आहे आणि या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पगार कापण्यासही मागे-पुढे पाहणार नाही. महापालिका असो, अथवा पालिका कर्मचारी, कॉमन केडर नसल्याने बदल्यांची भीती नसल्याने अधिकारी मनमानी वागतात. परंतु महापालिकेत मी असे होऊ देणार नाही. लोकांची सेवा हे माझे ब्रीद आहे. लोकांचा आशीर्वाद मला हवा आहे, त्यामुळे पीपल्स फ्रेंडली अशी महापालिका मला हवी आहे.

  •  स्मार्ट सिटी प्रकल्पांबद्दल विश्वासात घेतले जात नाही अशी तुमची तक्रार होती.  महापौरांना समितीवर स्थान दिले नव्हते. तुम्ही भांडून हे स्थान घेतले. स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत तुम्ही पुढे कसे पाऊल टाकणार आहात?

- बरोबर आहे, स्मार्ट सिटीसाठी प्रतिनिधीत्व मिळवण्याकरता आम्हाला भांडावे लागले. परंतु त्याची पर्वा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की यापुढे कोणतीही कामे शहरात येत असतील तर आम्हाला आधी विश्वासात घेतले जाईल. त्या दृष्टीने सकारात्मक कामही सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अधिकारी आता येतात, आम्हाला विचारतात, आम्हाला कामाची कल्पना देतात शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत बरेच प्रकल्प यावयाचे आहेत परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्याने सर्व थंडावले आहे.  आचारसंहिता उठल्यानंतर वेगवेगळ्या कामांसाठी निविदा काढल्या जातील आणि  कामे मार्गी लागतील. लोकांना हवी आहेत तीच कामे होतील. यापुढे कोणतेही काम करताना महापालिकेला त्या कामांची यादी अगोदर पाठवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना केली आहे.

  • शेवटी एकच सांगा बाबूश यांनी पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवून महापौरपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुकुट तुमच्या डोक्यावर ठेवला. गेल्या वर्षभरात तुम्ही असे काय केले की जेणेकरून बाबुश यांनी ही तुमच्यावर आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली?

- शहर स्वच्छ राहावे म्हणून माझे कायम प्रयत्न राहिले, कचऱ्याच्या बाबतीत लोकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी माझे प्रयत्न राहिले. मध्यंतरी साळगावला रोज पाठवल्या जाणार्‍या 10 टन ओल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हाही आमदार बाबूश यांच्या सहकार्याने हा प्रश्न धसास लावला. कांपालला 

ड्रग्ज विकले जात होते. पाईप्समध्ये ड्रग्ज ठेवले जात होते. ड्रग्जची विक्री तेथील झोपड्यांमधूनही केली जात होती. त्यांना पकडण्यास आणि ड्रग्ज विक्री थांबविण्यास आम्ही पोलिसांना भाग पाडले. मार्केटमधील गाळेधारकांची बरोबर येत्या महिन्यात महिन्यात करार होणार आहेत. बराच काळ हे काम अडले होते. दूरसंचार असो किंवा सार्वजनिक बांधकाम खाते अथवा वीज खाते, शहरातील रस्ते फोडून मनमानी कारभार चालायचा परंतु यापुढे असे चालणार नाही. शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांचे हॉट मिक्सिंग करून घेतलेले आहे. मे महिन्यापर्यंत आणखी काही रस्त्यांवर हॉट मिक्सिंग केले जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षे कोणालाही खोदकाम करता येणार नाही हे आम्ही आधीच बजावले आहे. गेल्या वर्षभरातील या सार्‍या कामांची पावती मला मिळाली याचा आनंद आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी माझे रिपोर्ट कार्ड बघूनच पुन्हा विश्वास दाखवलेला आहे आणि ही मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आणि माझी जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडणार.

 

Web Title: The municipality will make the people friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.