वास्कोत पार्किंग झोनमध्ये बेवारस वाहने, मुरगाव पालिका करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 09:59 PM2019-01-12T21:59:07+5:302019-01-12T21:59:22+5:30
मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे.
वास्को - मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे. तसेच शहरातील पार्किंगच्या जागेत ‘रेण्ट अ बाईक’च्या बºयाच दुचाकी दररोज उभ्या केल्या जातात. त्यामुळे इतरांना वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी मुरगाव पालिका लवकरच ‘पे पार्किंग’ सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
शहरात पार्किंगची समस्या कायम असून काही वाहने ब-याच वर्षांपासून पार्किंग झोनमध्ये आहेत. याबाबत नुकतीच मुख्याधिकारी तसेच पोलिसांशी बैठक घेतल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी दिली. ही वाहने ज्यांची असतील, त्यांनी ती न्यावीत अन्यथा लवकरच ती वाहने हटविण्यात येतील असे गावकर म्हणाले.
येथील जुन्या बस स्थानकाजवळ, तसेच एचडीएफसी बँकेजवळ मोठ्या प्रमाणात ‘रेण्ट अ बाइक’च्या दुचाकी पार्किंग क्षेत्रात उभ्या केल्या जातात. त्यामुळे अन्य नागरिकांना त्यांची वाहने पार्क करण्यास जागा मिळत नाही. वाहतूक खात्याने ‘रेण्ट अ बाइक’साठी मान्यता देताना त्यांना त्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी स्वत:ची जागा वापरण्यास सांगितले आहे, असे गावकर यांनी सांगितले. अशा प्रकारे ‘रेंण्ट अ बाईक’ च्या दुचाकी विविध पार्कींग जागेमध्ये उभ्या करून इतर नागरीकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी निर्माण करण्यात येणारा त्रास दूर करण्यासाठी लवकरच काही पार्कींग जागेत ‘पे पार्कींग’ सुरू करण्याचा मुरगाव पालिकेचा विचार असल्याचे नगराध्यक्ष गावकर यांनी सांगितले.
ती वाहने न हटविल्यास लिलाव
मुरगावचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली असता वास्को, बायणा, चिखली, सडा येथे विविध प्रकारची ६७ वाहने बेवारस स्थितीता उभी करून ठेवल्याचे दिसून आल्याचे सांगितले. या वाहनांचे क्रमांक वाहतूक खात्याला देऊन ही वाहने कोणाची आहेत, याची माहिती मिळवून संंबंधित वाहन मालकांना पत्र पाठवून ती हटविण्यास कळविले होते. तरीही ही वाहने हटविलेली नाहीत. ही वाहने १५ दिवसांत संबंधित मालकांनी हटवावीत. अन्यथा पालिका ती वाहने जप्त करून त्यांचा लिलाव करणार असे फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.