माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:32 PM2018-09-15T18:32:54+5:302018-09-15T18:33:19+5:30
अमेरिकेहून लोकमतच्या प्रतिनिधीला मुलाखत देताना मंत्री डिसोझा म्हणाले, की पर्रिकर यांनी ज्या इस्पितळात उपचार घेतले तिथेच मी उपचार घेत आहे.
- सदगुरू पाटील
पणजी : मी न्युयॉर्कमधील स्लोन केटरींग इस्पितळातच उपचार घेत असून माझ्यावरील वैद्यकीय उपचार येत्या दि. 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील, असे ज्येष्ठ मंत्री व म्हापशाचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी शनिवारी सांगितले.
अमेरिकेहून लोकमतच्या प्रतिनिधीला मुलाखत देताना मंत्री डिसोझा म्हणाले, की पर्रिकर यांनी ज्या इस्पितळात उपचार घेतले तिथेच मी उपचार घेत आहे. उपचारांनंतर आता मला खूप बरे वाटते. त्यामुळे मी गोव्यात अनेकांना फोन करतो व संवाद साधतो. तीन टप्प्यांत माझ्यावर उपचार सुरू असून ते 10 ऑक्टोबरला संपल्यानंतर गोव्यात परतण्याचा विचार करीन. अमेरिकेतील डॉक्टरांनी मला पहिल्या टप्प्यातील उपचार केल्यानंतर मुंबईला जाऊन तुम्ही थांबू शकता व मग परत येऊ शकता, असे मला सांगितले होते. मात्र, पुन्हा पुन्हा लांब पल्ल्याचा विमान प्रवास नको म्हणून मी अमेरिकेतच राहिलो.
मंत्री डिसोझा म्हणाले, की अमेरिकेत सायंकाळी वगैरे थोडे फिरून घेतो. विश्रांती खूप गरजेची असते. मला काही इस्पितळात रहावे लागत नाही. त्यामुळे मी न्यूयॉर्कमधील चर्चमध्ये जाऊन येतो. पार्कमध्ये सायंकाळी चक्कर मारून येतो. पर्रिकर यांच्यावर प्रथम उपचार झाले होते तेव्हा त्यांनीही थोडी विश्रंती घ्यावी, असे आम्हाला काहीजणांना वाटत होते. अमेरिकेतील इस्पितळात प्रथम आलो होतो तेव्हा मला स्ट्रेचरवरून यावे लागले होते. पण आता मी चालत फिरतो. अर्थात दुस:याचा आधार घेऊनच मी चालतो.
दरम्यान, मंत्री डिसोझा यांनी गणेशचतुर्थीच्या गोमंतकीयांना शुभेच्छा देणारा व्हिडिओ संदेशही पाठवला. तो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे.