नाम फाउंडेशन गोव्यात काम करणार: नाना पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 12:38 PM2024-10-08T12:38:40+5:302024-10-08T12:39:28+5:30
नाना पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात नाम फाउंडेशनच्या साहाय्याने विविध सामाजिक उपक्रम आम्ही आतापर्यंत हाती घेतले आहेत. गोव्यातही नाम फाउंडेशनतर्फे येणाऱ्या काळात आम्ही विविध उपक्रम राबविणार आहोत. यात प्रामुख्याने पिण्याचे पाण्याचे संवर्धन, शेतीला पुनर्जीवन, पशुपालन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी केले. गोवा विद्यापीठाच्या गोवा बिझनेस अध्ययन शाखेतर्फे सोमवारी नाना पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांनी तेथील विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण मिळावे, यासाठी चांगल्या शाळा सुरू करण्याचे काम हाती घेतले होते, नाम फाउंडेशनने सैनिकांना त्यांच्या या कार्यात सहकार्य करण्याचे ठरविले आहे. जम्मू-काश्मीरमधील शाळा या बिकट अवस्थेत होत्या आणि टाटा फाउंडेशन, नाम आणि सैनिकांमार्फत शाळा सुरू करण्यात आल्या, याशिवाय छत्तीसगड, ओडिशा या ठिकाणीदेखील कार्य केले जात आहे. आमचे ध्येय एकच आहे की, सर्व धर्मातील, जातींतील, समाजातील लोक मुख्य प्रवाहात यावेत, तरच देशाचा विकास होईल, असे पाटेकर म्हणाले.
आपण सर्वांनी कितीही मोठे झालो, तरी आपण सामान्य जीवन व राहणीमान आत्मसात करणे आवश्यक आहे. सामान्य असणे हीच आमची ताकद आहे, हे मी माझ्या अनुभवातून शिकलो. मी स्वतःला स्टार मानतच नाही, माझे पाय नेहमीच जमिनीवर ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि यातूनच मला शेतकऱ्यांसाठी काही तरी करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच, सामान्य राहिल्यामुळेच मी सरकारशी कुठलीही मिळत नसलेली गोष्ट भांडण करून मागत असतो, कारण सरकार हे आमच्यामुळेच आहे, असे पाटेकर यांनी सांगितले. आपल्याकडे जे आहे ते समाजाला देण्याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले.