समुद्रात अडकलेले नाफ्ता जहाज अखेर मुरगाव बंदरात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:04 PM2019-12-12T13:04:30+5:302019-12-12T13:04:43+5:30
गेले चार- पाच दिवस कंत्राटदार कंपनी नाफ्ता जहाज हटविण्याचा प्रयत्न करत होती.
पणजी : गेले 48 दिवस दोनापावल येथील समुद्रातील अडकांमध्ये रुतून बसल्यानंतर नू शी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज हटविण्यात अखेर हॉलंडच्या कंत्रटदार कंपनीला बुधवारी रात्री उशिरा यश आले. हे जहाज मुरगाव बंदरातील आठ क्रमांकाच्या धक्क्यावर नांगरून ठेवले गेले आहे.
नाफ्तावाहू जहाजाला मुरगाव बंदराने गोव्याच्या समुद्रात येण्यास परवानगी दिल्याने मुरगाव पोर्ट ट्रस्टवर आणि गोवा सरकारवरही लोकांकडून मोठी टीका सुरू होती. केरळमधील बंदराकडून या जहाजाला परवानगी नाकारली गेली होती. मात्र गोव्यात कोणताच उद्योग नाफ्त्याचा वापर करत नाही पण तरीही गोव्याच्या सागरी हद्दीत येण्यास या जहाजाला परवानगी दिली गेल्याने गोवा सरकारचीही विरोधकांनी कोंडी केली होती. काही मंत्र्यांवरही या प्रकरणी आरोप झाले होते. नू शी नलिनी जहाजाचे इंजिन बंद पडलेले आहे. हे जहाज ओढतच गोव्याच्या समुद्रात आणले गेले होते.
दोनापावल येथील गोवा राजभवनच्या मागे मोठा समुद्र आहे, त्या समुद्रातील खडकांमध्ये 48 दिवसांपूर्वी हे जहाज अडकले होते. जहाज हटविण्याचे मुरगाव बंदराचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर डीजी शिपिंग यंत्रणोने जागतिक निविदा जारी केली व हॉलंडच्या तज्ज्ञ कंपनीस कंत्रट दिले. जहाज हटविणे आणि त्यातील नाफ्ताही काढणे या कामासाठी एकूण तिस कोटी रुपयांना निविदा दिली गेली. एक महिन्याची मुदत कंत्राटदार कंपनीस दिली गेली.
गेले चार- पाच दिवस कंत्राटदार कंपनी नाफ्ता जहाज हटविण्याचा प्रयत्न करत होती. अखेर खडकातून जहाज सुटले व बुधवारी रात्री हे जहाज तरंगू लागले. बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी जहाज तरंगू लागल्याची माहिती जाहीर केली. हे रात्रीच मुरगाव बंदरात नेले गेले. ते पहाटे तीन वाजता आठ क्रमांकाच्या धक्क्यावर पोहोचले. त्यातील नाफ्ता काढण्याचे काम यापुढील दिवसांत सुरू होईल. नाफ्ता पेटला तर गोव्याच्या सागरी किना-याला व पर्यटनाला धोका पोहोचेल अशा प्रकारची भीती व्यक्त होत होती. नाफ्ता सुरक्षितपणे काढून गोव्याबाहेर नेल्यानंतरच गोमंतकीय सुटकेचा श्वास सोडतील.