जनरल स्टोअर्सच्या नावे मडगावात जुगारी अड्डा, तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 06:33 PM2018-01-20T18:33:30+5:302018-01-20T18:34:08+5:30
जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली.
मडगाव - जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली. त्यात या जुगारी अड्डयावर खेळण्यास आलेल्या तीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या कारवाईत पोलिसांनी चार संगणक, एक लॅपटॉप, आठ मोबाईल आणि सुमारे 8500 रुपये रोख जप्त केली.
मडगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोर्डा येथील या जनरल स्टोअर्समध्ये जुगारी अड्डा चालू आहे अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या अड्डय़ांवर बहुतेक विद्यार्थी खेळायला येतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे हा छापा टाकला असता, या अड्डय़ावर जुगार खेळताना तिघांना रंगेहात पकडले.
फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर अड्डा सडेकर यांच्या मालकीचा होता. त्याच्या जनरल स्टोअर्सच्याबाजूला असलेल्या एका खोलीत संगणकाव्दारे हा जुगार चालविला जायचा. या अड्डय़ावर काम करणारे ब्रजेन सरकार याला मालकासह अटक केली असून या अड्डय़ावर खेळण्यास आलेल्या हॅरिसन कश्यप (21), विनोदकुमार (21), इरफान खान (21) या तीन विद्याथ्र्याना व अक्षय नाईक (25) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात नवलेश देसाई पुढील तपास करीत आहेत.