13 हजार 431 मतदारांची नावे गोव्याच्या यादीतून रद्द, एकूण मतदारसंख्या आता 11 लाख 19 हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 11:22 PM2018-02-01T23:22:02+5:302018-02-01T23:22:14+5:30
राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रथमच यावेळी एकूण 13 हजार 431 लोकांनी गोव्याच्या मतदार यादीतून स्वत:हून आपली नावे रद्द करून घेतली आहेत.
पणजी : राज्यातील मतदारांची नवी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रथमच यावेळी एकूण 13 हजार 431 लोकांनी गोव्याच्या मतदार यादीतून स्वत:हून आपली नावे रद्द करून घेतली आहेत. नव्या 8 हजार 816 मतदारांची भर पडली असून राज्यात एकूण मतदार संख्या आता 11 लाख 19 हजार 777 झाली आहे.
यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात मतदारांची एकूण संख्या 11 लाख 10 हजार 961 होती. त्यात 5 लाख 46 हजार पुरुष व 5 लाख 64 हजार 470 महिला मतदार होत्या. आता महिला मतदारांचे एकूण प्रमाण 5 लाख 69 हजार 884 झाले आहे. पुरुष मतदारांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्तच राहिले आहे. पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 49 हजार झाली आहे. म्हणजेच फक्त तीन हजार नव्या पुरुष मतदारांची भर पडली आहे. या उलट महिला मतदारांची संख्या पाच हजारांनी वाढली आहे.
जे गोमंतकीय विदेशात जाऊन तिथेच स्थायिक होतात, त्यांची नावे मतदार यादीतून निवडणूक आयोगाकडून काढून टाकली जाते. तथापि, यावेळी 14 हजार 384 गोमंतकीयांनी स्वत:हून निवडणूक आयोगाकडे अर्ज केले व मतदार यादीतून नावे रद्द करण्याची विनंती केली. या 14 हजारांपैकी 13 हजार 431 अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारले व नावे मतदार यादीतून रद्द केली. मतदार यादीतून आपले नाव रद्द करावे म्हणून ताळगाव मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे 614 अर्ज आले. नावेली मतदारसंघातून 128 अर्ज आले. नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी फोंडा मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजे 889 अर्ज आले.
सर्वात कमी म्हणजे 357 अर्ज कळंगुट मतदारसंघातून आले. सर्वाधिक मतदार संख्या वास्को मतदारसंघात आहे. तिथे एकूण 35 हजार 922 मतदार संख्या आहे. सर्वात कमी मतदारसंख्या सांतआंद्रे मतदारसंघात झाली आहे. तिथे 20 हजार 844 मतदार झाले आहेत. मुरगाव मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे 10 हजार 443 आहे. नवी मतदारसंख्या कुठ्ठाळीत सर्वाधिक वाढली. तिथे 660 मतदारांची भर पडली. ही माहिती मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली.