गोव्यातील 510 पोर्तुगीज नागरिकांची नावे मतदार यादीतून रद्द
By admin | Published: November 18, 2016 09:09 PM2016-11-18T21:09:44+5:302016-11-18T21:09:44+5:30
गोव्यातील 510 पोर्तुगीज नागरिकांची नावे मतदार यादीतून रद्द करून त्यांना निवडणूक आयोगाने मतदानाचा हक्क नाकारला आहे. तथापि, राज्यातील एकूण 19 हजार व्यक्ती
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.18 - गोव्यातील 510 पोर्तुगीज नागरिकांची नावे मतदार यादीतून रद्द करून त्यांना निवडणूक आयोगाने मतदानाचा हक्क नाकारला आहे. तथापि, राज्यातील एकूण 19 हजार व्यक्ती प्रथमच मतदार बनल्या असून त्यांचा वयोगट अठरा ते एकोणीस वर्षे असा आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल व संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषद घेतली आणि यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. आत्तापर्यंत मतदार यादीतून एकूण 25 हजार नावे वगळली गेली पण त्यात पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त केलेल्या व्यक्तींची संख्या 510 आहे. उर्वरितांमध्ये काही हजार मतदार हे मृत झाले आहेत. काही जणांनी गोवा सोडला आहे तर काही जणांची नावे अन्य कारणास्तव मतदार यादीतून रद्द ठरली आहेत.
राज्यातील एकूण मतदार संख्या आता 10 लाख 85 हजारापेक्षा जास्त झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदार संख्या 71 टक्के आहे. एका मतदारसंघात सरासरी 27 हजार 132 मतदार आहेत, असे कुणाल व नावती यांनी सांगितले.
विविध ठिकाणी शिबिरे घेऊन व अन्य प्रकारे मतदार नोंदणी करण्याची विशेष मोहीम दि. 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबविली गेली. या मोहिमेमुळे एकूण संख्येत 47 हजार 177 मतदारांची भर पडली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस अगोदर देखील कुणालाही स्वत:चे नाव मतदार यादीत समाविष्ट करता येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. एकूण 530 अधिका-यांना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होईल हे तूर्त सांगता येत नाही, असे कुणाल म्हणाले.
राज्यातील एकूण मतदार - 10 लाख 85 हजार 271
पुरुष मतदार - 5 लाख 35 हजार 364
महिला मतदार - 5 लाख 19 हजार 907
विदेशस्थीत मतदार - 35
सेवा मतदार - 812
मतदारसंघातील सरासरी मतदार - 27 हजार 132
मतदान केंद्रातील सरासरी मतदार - 661