नाना पाटेकरसह 76 व्यक्ती व संस्थांची नावे जाहीर, विषय जमीन झोन बदलाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 07:24 PM2019-03-01T19:24:10+5:302019-03-01T19:24:14+5:30
शैक्षणिक संस्था आणि अनेक व्यक्तींनी मिळून प्रादेशिक आराखडा 2021 अंतर्गत 16 बी कलमाखाली स्वत:च्या जमिनीचा झोन बदलून मागितला आहे.
पणजी : राज्यातील अनेक राजकारण्यांचे नातेवाईक, अनेक हॉटेल्स, बिल्डर्स, शैक्षणिक संस्था आणि अनेक व्यक्तींनी मिळून प्रादेशिक आराखडा 2021 अंतर्गत 16 बी कलमाखाली स्वत:च्या जमिनीचा झोन बदलून मागितला आहे. अशा सर्व 76 अजर्दारांची नावे अधिकृतरित्या नगर नियोजन खात्याने शुक्रवारी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहेत. झोन बदलून मागणा:यांमध्ये अभिनेता नाना पाटेकरचाही समावेश आहे.
नगर नियोजन खात्याकडे झोन बदलासाठी अर्ज आल्यानंतर त्याविषयी खात्याने कोणती भूमिका घेतली व सरकारच्या नगर नियोजन मंडळाने कोणती शिफारस केली हे देखील तपशीलाने अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारीच्या तारखेने जारी झालेली ही अधिसूचना सरकारी राजपत्रत प्रसिद्ध केली गेली आहे. झोन बदलासाठी जर कुणाचाही आक्षेप असेल किंवा काही सूचना असेल तर येत्या दोन महिन्यांत सूचना व आक्षेप लोकांनी नोंदवावेत असे आवाहनही नगर नियोजन खात्याने केले आहे.
काही राजकारण्यांच्या पत्नी, भाऊ, अत्यंत जवळचे कार्यकर्ते यांच्या नावे अर्ज आले आहेत. काही शैक्षणिक संस्थांचे अर्ज आहेत तर काही हॉटेल्स आणि रियल इस्टेट व्यवसायिकांचे अर्ज आलेले आहेत. नाना पाटेकरने खोजरुवे- बार्देश येथे सुमारे पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन घेतलेली आहे. त्यापैकी काही जमीन ही सेटलमेन्ट झोनमध्येच येते. 17 हजार 200 चौरस मीटर जमीन ही इको-सेनसिटीव्ह क्षेत्रत येते. उर्वरित 7 हजार 728 चौरस मीटर जमीन ही सेटलमेन्ट झोनमध्ये बदलून देण्यास नगर नियोजन मंडळाने मान्यता दिली आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनने म्हावळींगे व कुठ्ठाळी येथे क्रिडाविषयक उपक्रमांसाठी जमिनीचा झोन बदलून मागितला आहे. तो देण्याची शिफारस झाली आहे. तानिया इस्टेट्स अॅण्ड रिसॉर्ट्स, मेघा आजगावकर, राजेंद्र देशप्रभू, धाकू मडकईकर, अॅडवेन लाईफकेअर, प्रतिभा कुडचडकर, परेश गायतोंडे, अरुणा लोबो, बॅटर डिल कंपनी, वीर डेव्हलपर्स, जीत आरोलकर, मांद्रे हॉटेल्स, विष्णूदास बांदेकर, निलेश नाईक, प्रसाद साळगावकर, अर्चना हरमलकर, विल्सन फर्नाडिस, इमपेटस रियल इस्टेट, गोपाळ गावस, अरुण फळदेसाई, फ्लावियान फर्नाडिस, शेरॉन साल्ढाणा अशी अनेक नावे आहेत. यापैकी काहीजणांचे भूखंड छोटे आहेत व काहीजणांचे अगोदरच एकूण जमिनीतील काही भाग सेटलमेन्टमध्ये दाखविला गेला आहे. काहीजणांच्या जमिनी ऑर्चड व भात शेतीच्या आहेत.