कोलवाळला 'नरकासूर' चालतो; 'रावणा'चे मात्र वावडे ! अजब नियमाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:46 AM2023-10-30T08:46:53+5:302023-10-30T08:47:09+5:30
जे घडते ते अधीक्षकांच्या परवानगीनेच
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कोलवाळ तुरुंगात रावणाची प्रतिमा दहन करण्यास कैद्यांना परवानगी दिल्याप्रकरणात तीन अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असले तरी अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. तुरुंगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच तुरुंगात नरकासुर प्रतिमा दहन दरवर्षी केले जात आहे. तुरुंगातील कैद्यांनी विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले आणि तिघांना निलंबित व्हावे लागले.
कोलवाळ कारागृहातील कैद्यांना रावणाची प्रतिमा बनविण्यासाठी आणि त्याचे दहन करण्यासाठी परवानगी दिलीच कशी या मुद्द्यावरून वादळ उठले आहे. त्याचे परिणाम तीन तुरुंग अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. वस्तुस्थिती अशी आहे की, कोलवाळ तुरुंगात असे प्रकार नवीन नाहीत. प्रत्येक दिवाळीच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी कोलवाळमधील कैदी नरकासुराची प्रतिमा बनवितात आणि दहनही करतात. या मुद्दयावरून कधी वादळ उठलेच नाही.
तसेच या कामासाठी कधी तुरुंग अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले नाही आणि त्यांना निलंबितही करण्यात आलेले नाही. परंतु, केवळ रावण प्रतिमादहनामुळे निलंबन ओढवले.
निर्णयात 'त्यांचा' सहभागच नाही...
तुरुंगात ज्या काही परवानग्या दिल्या जातात किंवा निर्णय घेतले जातात, ते सर्व तुरुंग अधीक्षकांच्या आदेशावरुन केले जाते. उपअधीक्षक, सहायक अधीक्षक किंवा इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्ण प्रक्रियेशी काहीच संबंध नसतो. रावणाच्या प्रतिमा दहनाला दिलेल्या परवानगीच्या बाबतीतही निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांचा काहीच संबंध नाही.
मान्यता असलेल्या साहित्यातून 'रावण'
तुरुंगात कोणते साहित्य नेण्यास परवानगी आहे आणि कोणते साहित्य नेण्यास परवानगी नाही याबद्दल एक अधिकृत यादीच तुरुंग अधीक्षकाने जारी केली आहे. त्यात गम, गनस्टीक, बेन्डिंग वायर, लहान बांबू, कात्री, दोरा, आदी वस्तू नेण्यास परवानगी आहे. कैद्यांनी केलेली रावणाची प्रतिमाही याच साहित्यातून केली होती, अशी माहितीही तुरुंग सूत्रांकडून देण्यात आली.