नरकासुरांना रोखावेच; गोव्याला श्रीकृष्णाची गरज आहे, नरकासुराची नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:17 AM2023-10-27T11:17:02+5:302023-10-27T11:18:08+5:30
नरकासूर प्रतिमांविषयी व त्या प्रथेविषयी विधाने करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
राजकारणातील नरकासुरांना दूर ठेवा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. गेल्या आठवड्यात वीज खात्याचा एक कार्यक्रम वास्कोत होता, त्यावेळी ढवळीकर हे नरकासूर प्रतिमांविषयी बोलले. राजकारणापासूनही नरकासुरांना दूर ठेवा किंवा राजकारणातील नरकासुरांना दूर ठेवा, असा सल्लाही ढवळीकर यांनी जनतेला दिला. ढवळीकर यांच्या विधानाचे दोन अर्थ होतात. विकृतींना राजकारणापासून दूर ठेवावे किंवा ज्यांची वृत्ती नरकासुरांप्रमाणे असते त्यांना दूर ठेवले जावे असे ढवळीकर यांना अपेक्षित आहे. वास्को व एकूणच मुरगाव मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. कधी कुणाला राजकारणातून निवृत्त करून टाकायचे किंवा कधी कुणाचा पराभव करायचा, कधी कुणाला दूर लोटायचे हे तेथील जनतेला कळते. मंत्री ढवळीकर यांनी अलीकडे सातत्याने नरकासूर प्रतिमांविषयी व त्या प्रथेविषयी विधाने करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
ढवळीकर यांचा हेतू शुद्ध आहे व चांगला आहे. राज्यात नरकासूर प्रतिमांचे फॅड हे प्रचंड वाढलेय. ते कमी व्हायला हवे, लोकांनी नरकासुरांऐवजी श्रीकृष्ण प्रतिमा निर्मितीवर भर द्यावा, असे ढवळीकर यांना वाटते. बुधवारी मांद्रे येथे झालेल्या कार्यक्रमावेळीही ढवळीकर यांनी पुन्हा एकदा नरकासूर प्रथेविषयी भाष्य केले. गोव्याला श्रीकृष्णाची गरज आहे, नरकासुराची नाही असा मुद्दा ढवळीकर मांडतात. श्रीकृष्ण पूजन सुरू करा, नरकासूर प्रतिमा तयार करू नका, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला आहे. ढवळीकर यांचे हे विधान मांद्रेतील जनतेने परवा ऐकलेच आहे. अलीकडे झोनिंग प्लानविरुद्ध यशस्वी आंदोलन केलेले आमदार जीत आरोलकर हेही ढवळीकर यांच्यासोबत या कार्यक्रमाला होते. झोनिंग प्लान मसुदा हादेखील मिनी नरकासूरच होता, आरोलकर व इतरांनी मिळून तो जाळला, असे पेडणे तालुक्याच्या जनतेला वाटते. असो. तो विषय वेगळा आहे.
मात्र, जनतेसमोर विविध समस्यांचे, प्रश्नांचे नरकासूरदेखील अधूनमधून उभे राहत असतात. त्या समस्यारूपी नरकासुरांचेदेखील वेळोवेळी दहन करावे लागते. दिवाळीचा सण जवळ येत आहे. गावोगावी युवक सध्या नरकासूर प्रतिमा तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. पूर्वी फक्त काही शहरांमध्ये व प्रत्येक गावात एकच नरकासूर प्रतिमा तयार केली जात होती. आता प्रत्येक वाड्यावर तीन-चार नरकासूर प्रतिमा तयार केल्या जातात. ही प्रथा अशी अतिप्रचंड वाढत गेल्याने मंत्री ढवळीकर चिंता व्यक्त करतात. अर्थात ढवळीकर यांनी युवकांना आवाहन केले तरी, एकदम नरकासुरांची संख्या घटणार नाही. कदाचित कालांतराने नरकासूर स्पर्धा वगैरे थांबतील. गल्लोगल्ली नरकासूर उभे करण्याची खरी गरजच नाही. दिवाळी सणाचा भाग म्हणून एका शहरात एक प्रतिमा तयार केली व सर्वांनी मिळून त्या प्रतिमेचे दहन केले, असे होऊ शकते.
नरकासूर प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी देणग्या गोळा केल्या जातात. पूर्वी ताळगाव व पणजीत बाबूश मोन्सेरात हे नरकासूर प्रतिमांसाठी देणग्या द्यायचे. नंतर त्यांनी हा खर्च बंद केला. लाखो रुपये अशाप्रकारे वाया घालविणे योग्य नव्हे, असे कदाचित मोन्सेरात यांच्या मेंदूला वाटले असावे किंवा दिवाळीवेळी असा खर्च केला तरी, प्रत्यक्षात निवडणुकीवेळीदेखील स्वतंत्रपणे खर्च करावाच लागतो, तरच मग मते मिळतात हेही काही आमदारांच्या लक्षात आले असावे. त्यामुळे सध्या तिसवाडीत तरी जास्त कुणी आमदार नरकासुरांसाठी देणग्या देत नाहीत. विधानसभा निवडणूक तोंडावर असते तेव्हा मात्र डोनेशन दिले जाते. मग एक काय, हजारो नरकासूर तयार केले तरी, राजकारणी देणग्या देतील.
ढवळीकर यांनी नरकासूर प्रतिमांच्या फॅडविरुद्ध कायमच भूमिका घेतली आहे. एक तरी मंत्री उघडपणे नरकासुरांविरुद्ध बोलण्याचे धाडस दाखवतात. श्रीकृष्ण प्रतिमा तयार करण्याच्या स्पर्धांचे प्रमाण वाढायला हवे. मग हळूहळू नरकासूर प्रतिमा स्पर्धाही बंद होतील. मडगावला नरकासूर स्पर्धेवेळीच काही वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. नरकासूर प्रतिमांची प्रथा काँग्रेसच्या राजवटीत गोव्यात सुरू झाली हा ढवळीकर यांचा मुद्दा मात्र पटत नाही. बाकी श्रीकृष्ण भक्ती वाढवा, हा ढवळीकर यांचा सल्ला युवकांनी स्वीकारण्यास हरकत नाही.