गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:16 PM2018-12-29T17:16:59+5:302018-12-29T17:31:30+5:30
मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही.
पणजी : मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही. पंतप्रधानांच्या सवडीनुसार उद्घाटनाची तारीख ठरणार आहे.
मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी करावे असे ठरले होते. पणजीचे माजी आमदार तथा गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी शनिवारी येथे सांगितले की, उद्घाटनासाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितली आहे. येत्या 11 व 12 जानेवारीला दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे त्यासाठी पंतप्रधान तिथे व्यस्त असतील. शिवाय गोव्याहून भाजपाचे सगळे आमदार-मंत्री व प्रमुख पदाधिकारी त्या सोहळ्य़ाला जाणार आहेत. त्यामुळे 12 रोजी मांडवी पुलाचे उद्घाटन होऊ शकणार नाही. पंतप्रधान त्यांच्या सवडीनुसार जी तारीख ठरवतील, त्या दिवशी उद्घाटन केले जाईल.
कुंकळ्ळ्य़ेकर म्हणाले, की आम्ही येत्या 10 रोजीच पुल पूर्णपणो सज्ज ठेवू. 10 तारीखर्पयत मांडवी पुलाचे सगळे काम पूर्ण होईल. त्याची सुरक्षिततेच्यादृष्टीनेही तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी करून ठेवली जाईल. लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंपनी या पुलाची कंत्रटदार कंपनी असून या कंपनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खास पणजीत थांबलेले आहेत. पूल असुक्षित किंवा अपूर्ण हा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा अर्थहीन आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही यापूर्वी या पुलाची पाहणी केली आहे. तिसरा मांडवी पुल हा सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा उद्घाटन झाले की, म्हापसाहून थेट वाहने मडगावच्या दिशेने जाऊ शकतील. मेरशीच्याबाजूने काम तूर्त होणार नाही किंवा वाहने एकदम पणजीत उतरविण्यासाठीही जे काम करायचे आहे, ते उद्घाटनानंतर केले जाणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.