नरेंद्र मोदी: सोनेरी विकासाची नऊ वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:35 AM2023-05-29T10:35:57+5:302023-05-29T10:38:25+5:30
देशात भाजपाची सत्ता येऊन उद्या, मंगळवारी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देदीप्यमान कार्यकाळाचा घेतलेला आढावा...
- संदेश साधले, समन्वयक, प्रसार माध्यम विभाग, भाजपागोवा
भाजपाने गेल्या नऊ वर्षांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास केला असून देश प्रगतिपथावर घोडदौड करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपली संपूर्ण हयात लोकांच्या सेवेत वाहिली असून गेली नऊ वर्षे त्यांनी देशासाठी समर्पित केली आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात समता निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी हे भाजपाच्या समाजकारण आणि राजकारणाचे प्रमुख सूत्र आहे.
देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक धोरण आणि कृतीत 'भारत प्रथम' ठेवला आहे. 'राष्ट्र प्रथम या संकल्पावर ते ठाम राहिले आहेत. यामुळेच आज आपला देश बाह्य "आणि अंतर्गत पातळीवर एका मजबूत हातात सुरक्षित असल्याचे आपल्याला दिसून येते.
आर्थिक व्यवस्थापन, उपेक्षित समाजाचे सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन, आव्हानात्मक उद्दिष्टे आणि निर्धारित मुदतीपूर्वी ते साध्य करणे हेच पंतप्रधान मोदी यांची मोठी उपलब्धी आहे. आपल्या देशाने कोविड-१९ काळात केलेल्या कार्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे. कोविडवर मात करण्यासाठी विक्रमी वेळेत संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने यश मिळवले.
गेल्या नऊ वर्षात बहुतांश क्षेत्रात देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात नोंदवली गेली आहे. देशात डिजिटल क्रांती होत असून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी ग्रामीण भागात विद्युतीकरण आणि प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
गेल्या नऊ वर्षात सार्वजनिक वितरण सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. जेएएम ट्रिनिटी है देशाच्या बदललेल्या आणि सु-विकसित डिजिटल माध्यमाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सरकारी योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत असून यापूर्वी कार्यरत असलेले तथाकथित दलाल आणि मध्यस्थांची साखळी नष्ट करण्यात आली आहे.
२०१४ पूर्वी देशात विकासकामांचा पाया घातला जात होता. पण अनेक कामे संथगतीने व्हायची तर काही कामे कायमची बंद होत होती. ही परंपरा पंतप्रधान मोदी यांनी मोडून काढली आहे. आता लोक 'मोदी है तो मुमकीन है' असे ठामपणे सांगतात.
मोदी सरकारने सर्वांगीण विकासाची संस्कृती आणली. विकास आणि कल्याणकारी योजनांनी विविध उपेक्षित गटांचे अपरिवर्तनीय सशक्तीकरण केले आहे. त्यांना महत्त्वाकांक्षी आणि स्वावलंबी बनण्यास मदत केली आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व अबाधित राखून होणाऱ्या विकासावर पंतप्रधान मोदी यांचा प्रचंड विश्वास आहे. भारताने पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर नेतृत्व केले आहे. पंतप्रधान मोदी
पर्यावरणीय चळवळीचा नेता म्हणून उदयास आले आहेत. पर्यावरणासह देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल बनलेल्या सुधारणा आणि प्रशासनात एक नवीन मानदंड स्थापित केला. केवळ भारतासाठीच नाही तर जगातील अनेक देशांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी लोकांना केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारी पाठबळ दिले.
देशाच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या अमृत पर्वात देशाचा आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांचा विकास हेच पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. सामाजिक न्यायासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना संधी आणि शेतकऱ्याचा उत्कर्ष ही नव्या भारताची कहाणी आहे.
"केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे' या उक्तीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत भारत देश काय चीज आहे, हे अवघ्या जगाला दाखवून दिले आहे.
कला, क्रीडा, साहित्य, सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग, बँकिंग, जहाज बांधणी, रेल्वे, विमान वाहतूक, परराष्ट्र धोरण, संरक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिला सबलीकरण, वारसा विकास, संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, पर्यटन, आरोग्य अशा एक नव्हे तर अनेक क्षेत्रात आपल्या देशाने भरारी घेतल्याचे आज दिसून येत आहे. गरिबांची सेवा आणि वंचितांचा विकास याकडे पंतप्रधान मोदी यांनी जातीने लक्ष दिले. कृषी क्षेत्रासाठी मशागतीपासून कृषी मालाच्या विपणनापर्यंत विविध योजना मोदी सरकारने सुरू केल्या. अमृत काळातील नव्या पिढीच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
मध्यमवर्गीयांचे जीवनमान अधिक सुलभ व्हावे यासाठी पावले उचलली आहेत. समाजाच्या तळागाळातील लोकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. राष्ट्र प्रथम या तत्त्वावर देशाचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण राबवले जात आहे. कोरोनानंतर जगातील अनेक अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या असतानाही आपल्या देशातील अर्थव्यवस्था आज भक्कमपणे उभी आहे. पारदर्शक उद्योग धोरणामुळे आज देशात व्यवसाय आणि उद्योग करणे अधिक सुलभ झाले आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने होत असलेला विकास आणि प्रगती यामुळे तसेच नवनवीन तंत्रज्ञानामुळे देशाला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. कधी नव्हे ते देशाच्या उत्तर- पश्चिम राज्यांचा विकास होताना दिसत आहे. या राज्यात विकासाचे नवे पर्व अवतरले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीसारखा जोखमीचा पण आवश्यक असलेला निर्णय घेऊन जगाला आपली धडाडी दाखवून दिली. जम्मू आणि काश्मीरला बहाल केलेले कलम ३७० रद्द करून आपली ताकद दाखवली. कालबाह्य झालेले शेकडो कायदे रद्द केले. आवश्यक तेथे नवीन कायदे करून अनेक बेकायदा गोष्टींना पायबंद घातला. देशाच्या सीमा मजबूत केल्या. सीमेवर कुरघोडी करणाऱ्या शेजारी राष्ट्रांना योग्य वेळी योग्य तो धडा शिकवला. सीमेवर कागाळ्या करणाऱ्या विस्तारवादी चीनला योग्य ती समज देऊन हा नवा भारत असल्याचे ठणकावून सांगितले. तिहेरी तलाक असो, राम जन्मभूमी असो किंवा देशातील दहशत आदी कारवाया असो प्रत्येक पातळीवर केंद्रातील भाजपा सरकारने मार्ग काढला, कृषी, उद्योग आणि रेल्वे क्षेत्रात आमूलाग्र बदल केले. देशातील महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांत वंदे भारत बुलेट ट्रेन सुरू केली. मोठ्या शहरांसह छोटया शहरांतील रेल्वे स्टेशननी कात टाकली. काही रेल्वे स्थानक तर पाश्चिमात्य देशात असल्याचा भास निर्माण करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केवळ नऊ वर्षांत देशाचा संपूर्ण कायापालट केला आहे. यापूर्वी देशात राज्य केलेल्या विरोधकांनी काही अपवाद वगळता अनेक प्रकल्प आणि विकासकामांची केवळ पायाभरणी केली; पण पुढे ही कामे एक तर रेंगाळली किंवा बंद पडली, पण भाजपाच्या काळात सुरू झालेले बहुतांश प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाले. अनेक प्रकल्प आणि विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. देशांतर्गत रस्ते, पूल यांचे जाळे निर्माण झाले आहे. दळणवळण गतिमान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा भाजपाच्या अनेक शिलेदार नेत्यांमुळे देशाचा चौफेर विकास होत आहे. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याने आज आपल्या देशाचा डंका जगभर वाजत आहे. एक सशक्त, सक्षम, धाडसी, नीडर आणि संयमी नेता म्हणून मोदींना जगमान्यता मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात अनेक देशांना लस पुरवठा केला. आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंका देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास विरोध करणाऱ्या तुर्कीला भूकंपाने उद्ध्वस्त झाल्यानंतर भरघोस मदत केली. कधी नव्हे ती अमेरिकेची अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अशा वेळी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे. हे नक्की!