पंतप्रधान मोदींची मार्च अखेरीस गोव्यात भेट शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:12 PM2019-03-07T13:12:55+5:302019-03-07T13:31:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सध्या देशभर सभा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झालेली नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपाने बहुतेक कार्यक्रम पार पाडले. गोव्यात 7 मार्चला मोदींची सभा होईल, असे प्रारंभी गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी जाहीर केले होते. मात्र मोदींची गोवा भेट त्यावेळी रद्द झाली. तेंडुलकर यांच्या मते मार्च महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान गोव्यात येऊ शकतात. मोदींची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाणार आहे. पंतप्रधानांकडून अजून गोवा भेटीची तारीख निश्चित केली गेलेली नाही.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (8 मार्च) गोवा भेटीवर येत आहेत. ते काँग्रेसच्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने जोरात तयारी चालवली आहे. काँग्रेसने प्रत्येक आमदाराला आपआपल्या मतदारसंघातून कार्यकर्ते आणण्यास सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या मते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता संमेलनास सुमारे दहा हजारांची उपस्थिती असेल. काँग्रेसचे केंद्रीय नेते व गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे सध्या गोव्यातच आहेत. त्यांनी गांधी यांच्या भेटीची पूर्वतयारी चालवली आहे. दोनापावल येथील किनारी हॉटेलमध्ये राहुल गांधी यांचा मुक्काम असेल. तिथे मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्यादृष्टीनेही सध्या तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व आमदारांची बैठकही होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी गोव्यात दाखल होतील.