राज्यात २९ आणि ३० तारखेला राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:39 PM2023-04-22T22:39:24+5:302023-04-22T22:39:40+5:30
चारचाकी वाहनांसाठी टाइम अटॅक इव्हेंटदेखील होणार असल्याची माहिती आयोजक फराद भाथेना यांनी दिली.
पणजी : सिएट लिमिटेड आणि इंडियन ऑटोमोटिव्ह रेसिंग क्लब (आयएआरसी) यांनी अखिल गोवा मोटरस्पोर्ट्स असोसिएशन (एजीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात दि. २९ आणि ३० एप्रिल दरम्यान भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेची दुसरी फेरी होणार आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी टाइम अटॅक इव्हेंटदेखील होणार असल्याची माहिती आयोजक फराद भाथेना यांनी दिली.
पणजीत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत फराद भाथेना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शर्मद रायतुकर, उमेश पांडे आणि वैभव मराठे उपस्थित होते.
बेंगलोर मोटर स्पोर्ट्स (बीएमएस) हे भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस २०२३ चे प्रवर्तक आहे. सदर स्पर्धा फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. आम्ही ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यास उत्सुक आहोत. यामागे मुख्यतः स्थानिक, तळागाळातील मोटरस्पोर्ट्स प्रतिभेला आकर्षित करणे हा हेतू आहे. ही स्पर्धा सर्व कारप्रेमींसाठी खुली आहे. यासाठी आयएआरसी संकेतस्थळावर प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे, असे भाथेना यांनी यावेळी सांगितले.
२०० स्पर्धकांचा सहभाग
या स्पर्धेत सुमारे २०० मोटरस्पोर्टस् स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील सुमारे ७० ते ७५ स्पर्धक हे गोमंतकीय असणार आहेत. त्यामुळे वेगळा थरार येथे पाहायला मिळणार आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि गोवा क्रीडा प्राधिकरणामुळे ही स्पर्धा राज्यात होणे शक्य होत आहे, असे यावेळी शर्मद रायतुरकर यांनी सांगितले.