मोपा विमानतळ प्रकल्पाच्या कामावर निरी लक्ष ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:37 PM2020-01-17T15:37:54+5:302020-01-17T15:38:24+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.
पणजी : शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम येत्या दहा दिवसांत नव्याने सुरू होणार आहे. जीएमआर ही कंत्रटदार कंपनी त्यासाठी पूर्वतयारी करू लागली आहे. मोपा विमानतळ प्रकल्पाचे काम करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, जैवविविधतेवर परिणाम होऊ नये तसेच सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या अटींचे पालन व्हावे या हेतूने निरी संस्था बांधकामावर लक्ष ठेवणार आहे.
राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामावर लक्ष ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने मोपा विमानतळासाठीच्या पर्यावरणविषयक दाखल्यावरील (ईसी) निलंबन उठविले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नव्याने काम सुरू होण्यास हरकत नाही असे एका अधिकाऱ्यानेन सांगितले. मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने 85 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे भूसंपादन काही वर्षापूर्वी केले.
विमानतळाला जोडणारा एक नवा मार्गही बांधला जाणार आहे. विमानतळावर दोन धावपट्टय़ा असतील. सध्या एक धावपट्टी व टॅक्सी वे बांधली जाईल. एकदा मोपा विमानतळ उभा राहिल्यानंतर गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल, असे सरकारला वाटते. विमानतळ चालविताना कंत्रटदार कंपनीला जेवढा महसुल मिळेल,त्यापैकी 36 टक्के महसुल सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.
दरम्यान, विमानतळ बांधताना किती प्रमाणात झाडे कापायची आणि किती नवी झाडे लावायची हे ठरलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईसीचे निलंबन जरी मागे घेतले तरी, पर्यावरण व जैवविविधता राखण्याच्यादृष्टीने अनेक सूचना न्यायालयाने केल्या आहेत. गोवा सरकारला व जीएमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला या सूचनांचे पालन करावे लागेल. हे पालन नीट केले जाते की नाही यावर निरी संस्था देखरेख ठेवील.