राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : तांत्रिक समितीकडून स्पर्धा केंद्रांना भेटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 04:49 PM2018-12-20T16:49:25+5:302018-12-20T16:50:08+5:30

प्रकल्प कामांवर समाधान, आजही होतील चार बैठका

National sports competition: Technical committee to visit centers! | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : तांत्रिक समितीकडून स्पर्धा केंद्रांना भेटी!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : तांत्रिक समितीकडून स्पर्धा केंद्रांना भेटी!

Next

पणजी : राज्यात येत्या ३० मार्च ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्याचे सत्र सुरू आहे. बुधवारी स्पर्धेच्या तांत्रिक समितीने (जीसीटीसी) स्पर्धा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांनी अधिकाºयांसोबत चर्चा केली. गांभीर्याने पाहणी केली. सरकारकडून सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांवर त्यांनी समाधान व्यक्त करीत ‘आगे बढो’ असा सल्लाही दिला. 
राष्ट्रीय स्पर्धेच्या पाहणीसाठी खास दिल्ली येथून आलेल्या तांत्रिक समितीमध्ये निरीक्षक मुकेश कुमार, डॉ. एस. एम. भाली आणि धनराज चौधरी यांचा समावेश होता. या त्रिकुटाने स्पर्र्धेचे संयुक्त सचिव तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांच्याशी चर्चा केली. प्रभुदेसाई यांनी या समितीला विविध केंद्रांवर तेथील कामांचा आढावा दिला. स्पर्धा केंद्रांच्या भेटीनंतर सायंकाळपासून रात्रीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे सत्र सुरू होते. रात्री १०.३० वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. यामध्ये निवास, गेम आॅपरेशन, वाहतूक, डिझाईन एजन्सी, पीआर एजन्सी, ट्रेनिंग, स्वयंसेवक, सुरक्षा आदींवर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
तांत्रिक समितीने बुधवारी सकाळी १० वाजता कांपाल येथील स्पर्धा केंद्र स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली. सावळवाडा-पेडणे आणि कांपाल स्टेडियमचे काम पाहून समितीने प्रशंसा केली. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी कामात खूप सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ५५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येत्या दोन महिन्यांत सर्व कामे आटोपण्यात येतील. त्यानुसार कंत्राटदार जोमाने काम करीत आहेत. २४ तासही ते कामात असतात. त्यामुळे आम्हाला वेळेत कामे होतील, याबाबत पूर्ण विश्वास आहे. विशेष म्हणजे, या सर्व कामांवर मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, क्रीडा सचिव आदींची देखरेख आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनसोबत बैठक आहे. या बैठकीत स्पर्धेचे सविस्तर सादरीकरण करण्यात येईल. बैठकीसाठी क्रीडा सचिव अशोक कुमार आणि मी स्वत: जाणार असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले. 


आज होतील चार बैठका
तांत्रिक समिती दोन दिवस गोव्यात आहे. गुरुवारी (दि. २०) ही समिती चार बैठका घेणार आहे. यामध्ये स्पर्धेच्या निवास, वाहतूक, क्रीडा संघटना आणि आयोजनासंबंधित अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येईल. मुख्य सचिवांकडूनही विविध खात्यांच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला होता. त्यात क्रीडा संचालनालयास ग्लोबल निविदा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ताबडतोब ग्लोबल निविदा काढण्यात येतील. 


संघटनांसोबतही होणार बैठक
राज्यातील स्पर्धेच्या तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे खेळाडूंची निवड आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. स्पर्धेेत ३५ खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांत राज्याचा सर्वाेत्तम संघ निवडण्यात यावा आणि त्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, यावर विशेष भर देण्यात येईल. खेळाडूंसाठी अनिवास आणि निवासी शिबिरे लवकरच सुरू होतील. राष्ट्रीय खेळाडूंच्या कामगिरीची माहिती ही संबंधित संघटनांना असते. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडूंची निवड करण्यासाठी वेळ लागत नाही. या खेळाडूंना अधिकाधिक सराव करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे तरच त्यांच्याकडून चांगल्या निकालाची अपेक्षा करता येईल, असेही प्रभुदेसाई म्हणाले.


या प्रकल्पांचा समावेश
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी उभारण्यात येणाºया प्रकल्पांमध्ये सावळवाडा-पेडणे, हॉकी स्टेडियम-म्हापसा, इनडोअर स्टेडियम कांपाल यांचा मुख्यत्वाने समावेश आहे. कांपाल येथे बेसबॉलसाठी मैदानही उभारण्यात येईल. त्यासाठी ४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय टेनिस स्टेडियम- फातोर्डा, नावेलीचे इनडोअर स्टेडियम यांचाही समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित नेहरू स्टेडियम आणि ताळगाव येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमला रंगरंगोटी करण्यात येईल.

Web Title: National sports competition: Technical committee to visit centers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा