घरी परतणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
By पंकज शेट्ये | Published: January 13, 2024 04:38 PM2024-01-13T16:38:53+5:302024-01-13T16:39:02+5:30
रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टीप्परला धडक दिल्यानंतर रुतूल शुतीया जागीच मरण पावला
वास्को: शक्रवारी उशिरा रात्री वरुणापूरी महामार्गावरून दुचाकीने घरी जाताना झालेल्या अपघातात भारतीय नौदलाचा कर्मचारी रुतूल शुतीया जागीच ठार झाला. ३४ वर्षीय रुतूल दुचाकीने जाताना वरुणापूरी महामार्गाच्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या एका टीप्पर अवजड वाहनाला त्याच्या दुचाकीने जबर धडक दिल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती पोलिसांनी दिली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.१३) रात्री ११ वाजता तो अपघात घडला. आसाम येथील मूळ रुतूल हा तरुण भारतीय नौदलात कर्मचारी म्हणून कामाला आहे. तो वरुणापूरी, वास्को येथील नौदलाच्या वसाहतीत त्याची पत्नी आणि मुलासहीत राहतो. शुक्रवारी रात्री ११ वाजता रुतूल दुचाकीने दाबोळी विमानतळाच्या दिशेतून वरुणापूरी जंक्शनच्या दिशेने येताना अचानक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याच्या दुचाकीने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टीप्परला जबर धडक दिली. दुचाकीची टीप्परला धडक बसल्यानंतर रुतूल गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावर कोसळला. अपघातानंतर रुतूल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती वास्को पोलीसांनी दिली.
पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर जाऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच मयत रुतूलच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तो मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. शनिवारी रुतूलच्या मृतदेहावर शवचिकीत्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करीत आहेत.