मराठी ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची कानात बोटं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 08:00 PM2019-07-31T20:00:47+5:302019-07-31T20:03:12+5:30
भाषांतर करण्याची राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
पणजी : गोवा विधानसभेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करताना मराठीतून भाषण सुरू केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार असलेले चर्चिल आलेमाव यांनी कानांत बोटे घातली. ‘सभापती महाशय काहीच समजत नाही, कोंकणीतून भाषांतर व्हावे,’ असे त्यांनी सांगितले.
साखळी-गोवा येथील एका संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना साखळी भूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार ढवळीकर सभागृहात उभे राहिले होते. ‘सभापती महाशय, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे..’ म्हणून ढवळीकर यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी चर्चिल आलेमाव जाग्यावरून उभे राहिले. त्यांनी कानांत बोटे घातली. काहीच समजत नाही, असे सांगून त्यांनी सभापतींकडे याचे कोंकणीतून भाषांतर पाहिजे अशी मागणी केली. त्यावर सभापतींनी त्यांना सध्या तुम्ही बसा, तुम्हाला नंतर मी कोंकणीतून सांगतो असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी ‘म्हाज्या मोगाच्या मित्रा, प्रमोद सावंत हांका परबी’ (माझो प्रिय मित्र, प्रमोद सावंत यांना शुभेच्छा) असे त्यांना कोंकणीतून भाषांतर करून सांगितले. चर्चिल यांना मराठी येत नाही ही खरी गोष्ट नाही, असेदेखील राणे यांनी सुनावले. याच सभागृहात चर्चिल यांनी ‘ये रे ये रे पावसा’ ही कविता म्हणून दाखविली होती, याची आठवणदेखील राणेंनी करून दिली. त्यावर ही कविता आपल्याला केवळ तोंडपाठ आहे; परंतु त्याचा अर्थ कळत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापुढे भाषांतर करणारे दुभाषी नेमण्याचे आश्वासनही सभागृहात दिले.