नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांची आवश्यकता: सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:54 PM2023-10-10T14:54:33+5:302023-10-10T14:59:06+5:30
शिवनाथ शिरोडा येथील शिवनाथी मंदिरात सभा मंडपात आरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व उपाय सुचवण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची गरज आहे. गावामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी आपल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे उद्गार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
शिवनाथ शिरोडा येथील शिवनाथी मंदिरात सभा मंडपात प.पू. शांताप्रसाद अद्वितानंद समाधी न्यास चिकनगाळ, शिरोडा व्हिक्टर हॉस्पिटल ए. एस. जी. हॉस्पिटल आणि आरोग्य निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. शांताप्रसाद अद्वितानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या पंधराव्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवनाथ देवस्थानचे अध्यक्ष राजू प्रभू गावकर, सुरेश प्रभू देसाई, उद्योजक जयंत मिरींगकर, प्राचार्य विवेक पिसुर्लेकर, डॉ. जोशी, किशन मंगेशकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरात ३० व्यक्तिनी रक्तदान केले. सुमारे ७० हून अधिक जास्त लोकांनी नेत्र तपासणी करून घेतले. यावेळी गरजूंना चष्मे वितरण व औषध पुरवण्यात आले. जयंत मिरींगकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य विकास पिसुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. सार्थक फाउंडेशन, रक्त शिबिर आरोग्य निकेतन आयुर्वेदिक आणि पंचकर्म सेंटरतर्फे आयोजित चिकित्स ए. एस. जी. आधी हॉस्पिटलतर्फे तपासणी करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली.