गोव्यात किना-यांवर शॅक उभारताना यापुढे अधिक काळजी गरजेची, जाणकरांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 01:39 PM2017-12-05T13:39:42+5:302017-12-05T13:43:56+5:30
गोव्याचा पर्यटन हंगाम ऐनभरात आलेला असताना आणि लाखो पर्यटक सध्या गोव्यात असताना ओखी वादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर आता जी स्थिती निर्माण केली आहे, तशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असे गोव्यातील शॅक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पणजी : गोव्याचा पर्यटन हंगाम ऐनभरात आलेला असताना आणि लाखो पर्यटक सध्या गोव्यात असताना ओखी वादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर आता जी स्थिती निर्माण केली आहे, तशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असे गोव्यातील शॅक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 80 पेक्षा जास्त शॅकमध्ये पाणी घुसून एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. यापुढे किना-यांवर शॅक उभारताना अधिक काळजी घ्यावी लागेल. हे ओखी वादळाच्या तडाख्यामुळे स्पष्ट होत आहे. गोव्यातील जाणकारांचे तरी तसेच मत बनले आहे.
गोव्याला 105 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. शॅक म्हणजे पर्यटन गाळे. केवळ गोव्याच्याच किना-यांवर हे वैशिष्ट्यपूर्ण शॅक सापडतात. गोव्याच्या पर्यटनाची शान म्हणून ते ओळखले जातात. सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम न करता बांबू, माडाच्या झावळ्या आणि अन्य लाकडी साहित्य वापरून शॅक उभे केले जातात. या शॅकमध्ये गोव्यातील ताज्या माशांपासून बनविलेले विविध प्रकारचे पदार्थ आणि मद्य मिळते.
विदेशी पर्यटकांची गर्दी अशा शॅकमध्येच जास्त असते. उधाळलेल्या समुद्राचे विहंगम दृश्य पाहत अनेक तास अशा शॅकमध्ये बसून मद्याचा आणि खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यात विदेशी पर्यटक धन्यता मानतात. काहीवेळा ते बराचवेळ पुस्तके वाचत अशा शॅकमध्ये बसतात.
गोव्याच्या किनारपट्टीत एकूण साडेतीनशे शॅक पाहायला मिळतात. ते रांगेत उभे केलेले असतात. या शॅकना कधीच वा-या-पावसाचा एरव्ही त्रास होत नव्हता. कारण डिसेंबरमध्ये गोव्यातील वातावरण व हवामान हे खूप चांगले असायचे.
मात्र यावेळी प्रथमच शॅकमध्ये प्रचंड पाणी घुसले. स्वयंपाकगृहे देखील वाहून गेली. फ्रिज, टीव्हीयासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हानी झाली. गोव्यातील शॅक व्यावसायिकांनी निसर्गाचा असा तडाखा कधीच अनुभवला नव्हता. गोव्यात पर्यटन खात्याकडून शॅकना परवानगी दिली जात असते आणि हे शॅक फक्त आठ महिने केवळ पर्यटन हंगामापुरतेच असतात. किनारपट्टी नियमन प्राधिकरणाकडून ना हरकत दाखला मिळाल्यानंतरच ते उभे करता येतात. जून महिन्यापूर्वी ते किना-यावरून काढून टाकावे लागतात.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वत: केरी-तेरेखोल या किनारपट्टीला भेट दिली व पाहणी केली. ते म्हणाले की शॅकचे झालेले नुकसान धक्कादायक आहे. गोव्यातील केरी व अन्य काही शॅक हे नाजूक आहेत, तिथे किना-यांची धुप होत असते. संरक्षक भिंतींच्या खाली जे शॅक होते, त्यांना तडाखा बसला. यापुढे शॅकना संरक्षक भिंतीच्या वरच्या भागात जागा द्यावी लागेल. पर्यटन खात्याने तसा विचार करावा लागेल. संरक्षक भींतीच्या खाली शॅक उभे केल्यास आत पाणी जाते हे सिद्ध झाले.
गोव्याचे महसूल मंत्री रोहन खंवटे म्हणाले, की राज्याचे एकूण पर्यटन धोरण व शॅक धोरण यावर नव्याने विचार होणो गरजेचे आहे. अशा प्रकारच्या आपत्त्या ह्या कधीच सांगून येत नाहीत. कळंगुटचे आमदार व हॉटेल व्यवसायिक मायकल लोबो म्हणाले, की कळंगुट व कांदोळीतही शॅकची हानी झाली. शॅक अधिक सुरक्षित पद्धतीने कसे उभे करता येतील यावर विचार व्हावा.