गावच्या विकासासाठी प्रकल्प हवेत; उठसूट विरोध करू नका!; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 01:43 PM2023-12-09T13:43:31+5:302023-12-09T13:44:13+5:30
'लोकोत्सव २३'चे शानदार उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : गावचा विकास होण्यासाठी गावात प्रकल्प यायला हवेत. काणकोण दहा वर्षांमागे मागासलेला होता. आज विकसनशील होऊ लागला आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी प्रकल्पांची गरज असून उठसूट प्रकल्पांना विरोध करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.
आमोणे-पैंगीण येथील आदर्श युवक संघ, बलराम शिक्षण संस्था, कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'लोकोत्सव २०२३'च्या उदघाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना, लोकोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार दिगंबर कामत, आमदार डिलायला लोबो, बिहारच्या आमदार नीती ओब्राहम, गोव्याचे मुख्य सचिव पुनीत गोयल, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, भाजपचे सचिव सर्वानंद भगत, काणकोण भाजपचे सचिव दिवाकर पागी, सरपंच सविता तवडकर, आनंदू देसाई, प्रिटल फर्नांडिस, निशा च्यारी, सेजल गावकर, जि. पं. अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, जि. पं. सदस्य शाणू वेळीप, कुशाली वेळीप, अंकुश गावकर, अशोक गावकर उपस्थित होते. पारंपरिक दिवज पेटवून लोकोत्सवाचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अंत्येदय, सर्वोदय, ग्रामोदय ही तत्वे मानून गोवा सरकार काम करीत आहे. २००० साली लोकोत्सवाची सुरुवात झाली होती. त्याचे फळ आता मिळत आहे. समाजात बदल घडविण्यासाठी राजकारणाची गरज असून श्रमधाम संकल्पनेअंतगर्त आतापर्यंत २२ घरे बांधली आहेत. तवडकर करीत असलेल्या कामांना सदोदित सहकार्य मिळत राहील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
रमेश तवडकर तळागाळातील लोकासांठी जे काम करतात ते काम कोणी विसरु शकणार नाही. भारतीय संस्कृतीत समर्पण पाहायला मिळते ते काणकोणात पाहायला मिळाले. घामाला घाम मिळतो तेव्हाच आपुलकी निर्माण होते. ज्यांच्या तोंडावर हसू असते तोच दुसऱ्याच्या तोंडावर हसू आणु शकतो, असे उद्गार उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना यांनी काढले.
आमदार कामत म्हणाले, यापूर्वीही काणकोणात लोकोत्सव झाले होते. तेव्हा आपण कला संस्कृती मंत्री होतो. मात्र रमेश तवडकरांच्या लोकोत्सवाला तेव्हा काहीच कमी पडू दिले नव्हते. खरी संस्कृती काणकोणात पाहायला मिळते. संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी व एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी तवडकर यांचे कौतुक केले. यावेळी सरकारचे मुख्य सचिव पुनीत गोयल यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेले निवृत्त आयएएस अधिकारी संदीप जॅकिस, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकुर, प्रदीप आंतोनियो दा कॉस्ता, मेघना शेटगावकर, पत्रकार सुशांत कुंकळेकर, तेजस्वी पै, ईशा सावंत व सुनील गोसावी यांचा मान्यवराहस्ते सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तवडकर यांनी केले. अशोक गावकर यांनी आभार मानले. यंदा लोकोत्सवात पारंपरिक खाद्यपदार्थ, संग्रही वस्तू, कंदमुळे, गावठी औषधे, शेती अवजारे, विविध सांस्कृतिक संघ, क्रीडा संघ यांच्या कलेचे दर्शन उपस्थितांनी घेतले.
कर्मचारी निवड आयोगामार्फत ३१ पूर्वी नोकरीची पहिली जाहिरात
गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत 'क' श्रेणी पदांसाठी 3 पहिली सरकारी नोकरीची जाहिरात येत्या ३१ पूर्वी प्रसिद्ध केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. प्रक्रियेला थोडा विलंब झाल्याचेही ते म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये आणि आयोगाच्या
https://gssc.goo.gov.in या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच भरतीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. परीक्षा संगणकावर आधारित असतील. जानेवारी किवा फेब्रुवारीमध्ये या पदांसाठी मुलाखती होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी असाही पुनरुच्चार केला की, एमटीएस (मल्टीटास्किंग) ते एलडीसी (कनिष्ठ लिपिक) पदांसाठी एक वर्षाचा अनुभव किंवा एक वर्ष शिकाऊ उमेदवारी अनिवार्य असेल.
माणुसकीचा गाव उभा करू : सभापती तवडकर
सभापती रमेश तवडकर म्हणाले की, बलराम शिक्षण संस्था गोव्यात एक वेगळ्या प्रकारचा आदर्श घालून देणार आहे. काणकोण हा माणुसकीचा गाव करुन दाखवायचा आहे. माणुसकी ज्या दिवशी आम्ही सोडणार तेव्हा आमच्याकडे काही राहणार नाही. लोकोत्सवाच्या विषयात कोठेच खोट नाही. मुख्यमंत्र्यांनी अशाचप्रकारे सहकार्य केल्यास समृद्ध काणकोण बनविणे कठिण नाही, असेही तवडकर यांनी सांगितले.