गोव्यात सार्वजनिक स्मशानभूमी उभारणे गरजेचे, दलित पुरस्कार वितरण सोहळ्यात अॅड. खलप यांचं प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 06:25 PM2017-10-02T18:25:36+5:302017-10-02T23:03:07+5:30
सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते.
पणजी : सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते. त्यामुळे सरकारने राज्यभर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.
मिनेडिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सोमवारी दलित संघटनेतर्फे दलित मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना अॅड. खलप दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजसेवेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल विठ्ठल बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, माजी सभापती शंभुभाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.
अॅड. खलप म्हणाले की, राज्य सरकारने कोमुनिदादच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारावी. माणूस म्हणून धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुस-या बाजूला याच धर्माच्या व्यंगांना कवटाळून बसतो आहोत. जातीची थोरवी किती मिरवायची, ख-या अर्थाने उन्नती साधायची असेल, तर ती जीर्णवस्त्रे झटकली पाहिजेत. कुशल बुद्धीच्या सामर्थ्यावर समाजात अत्युच्च शिखरावर असलेल्या म. गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना जातीच्या नावाखाली खाली खेचण्याचा प्रयत्न होत असून, तो चुकीचा आहे.
माणसाचा शारीरिक विकास झाला असला, तरी मनाचा झालेला नाही. देशातील जनतेत जातीयतेचा कचरा शिरला आहे, तो साफ करण्यासाठी महात्मा गांधींना आणखी कितीवेळा जन्म घ्यावा लागेल, असा प्रश्नही अॅड. खलप यांनी उपस्थित केला.