नीट परिक्षा निकाल: घोटाळ्याचा गोवा 'अभाविप'कडून निषेध, NTAवर कारवाई करण्याची मागणी
By वासुदेव.पागी | Published: June 11, 2024 05:16 PM2024-06-11T17:16:58+5:302024-06-11T17:17:55+5:30
१० जूनला देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली
वासुदेव पागी, पणजी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने पणजी बसस्थानकावर एनटीए विरुद्ध आंदोलन केले. नीट परीक्षा निकालातील घोटाळ्याचा अभाविप तर्फे ९ जून रोजी सुरतमध्ये आंदोलन झाले आणि १० जूनला देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली.
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे नीट युजी ची परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. देशभरात ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक घोटाळे झाल्याची शक्यता देशाच्या विविध भागांतून समोर येत आहे. नीट चा १४ जून रोजी लागणारा निकाल ४ जून रोजी घोषित झाला, यात ६७ विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.
परीक्षेच्या निकाला संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिल्हा संयोजक सन्मई गांवस बोलताना म्हणाली की "काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे ग्रेस मार्क देण्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या मार्क्स आणि ग्रीटिंग्स मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे असे कारण एनटीए कडून देण्यात आले आहे. परंतु या संदर्भात कोणत्या फॉर्मूल्यानुसार गुणांमध्ये वाढ केली आहे व किती विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाली आहे याबद्दलची स्पष्टता देण्यात आलेली नाही."
जिल्ह्यातील कार्यकर्ता विनय राऊत बोलताना म्हणाला की "विद्यार्थ्यांच्या अफाट मेहनतीने जास्त गुण मिळवून सुद्धा त्यांना देशातल्या अव्वल महाविद्यालयांमध्येसुद्धा प्रवेश मिळत नाहीये. त्यामुळे विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत." या आंदोलनाच्या दरम्यान अंशुल सिनारी, कल्पेश वाळके, ओम सिंघ, विनायक मळीक,लक्ष्मण नाईक, स्वस्ति भाणस्तारकर व दिया टेमकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेतलेल्या नीट युजी परीक्षा प्रक्रियेची सीबीआय मार्फत चौकशी करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.