भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत गोव्यास नगण्य स्थान
By admin | Published: June 14, 2016 02:54 AM2016-06-14T02:54:38+5:302016-06-14T02:56:03+5:30
पणजी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलाहाबादमध्ये पार पडली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
पणजी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलाहाबादमध्ये पार पडली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही या बैठकीत भाग घेतला. दोन्ही दिवस बैठकीतील सारी चर्चा उत्तर प्रदेशमधील यापुढील निवडणुकीवर केंद्रीभूत होती. गोवा विधानसभा निवडणुकीचा विषय हा राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीत नगण्यच
ठरला.
उत्तर प्रदेश व अन्य मोठ्या राज्यांच्या तुलनेत गोवा हे खूपच लहान राज्य असल्याने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत गोव्यातील निवडणुकांबाबत फारच अल्प अशी चर्चा झाली. उत्तर प्रदेशमधील राजकारण, तेथील जातीय समीकरणे व त्या निवडणुका जिंकण्याबाबतची रणनीती याविषयीच बैठकीत सारी चर्चा झाली. गोवा विधानसभेची निवडणूक येत्या आठ महिन्यांत होणार आहे. त्याबाबतचे थोडे उल्लेख बैठकीत आले, असे सूत्रांनी सांगितले.
गोव्याविषयी थोडीफार चर्चा बैठकीत झाल्याचा दावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
दरम्यान, वस्तू व सेवा कर (जीएसटी) विषयीच्या केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक उद्या मंगळवार व बुधवारी कोलकाता येथे होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, अर्थ खात्याचे सचिव दौलतराव हवालदार, वाणिज्य खात्याचे संचालक बांदेकर आदी कोलकाता येथे सोमवारी सायंकाळी दाखल झाले.
आमचा जीएसटीला पाठिंबा आहे. बैठकीत जीएसटीचा मसुदा निश्चित केला जाईल, असे डिसोझा यांनी लोकमतला सांगितले.
(खास प्रतिनिधी)