एसीबीकडून होतेय नाहक बदनामी : गोवा विरोधी पक्षनेते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 12:40 PM2017-10-04T12:40:30+5:302017-10-04T12:40:42+5:30
आपण लोकायुक्तापासून संपत्तीची माहिती लपवल्याचे सांगून एसीबीकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे.
पणजी : आपण लोकायुक्तापासून संपत्तीची माहिती लपवल्याचे सांगून एसीबीकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे आपली बदनामी होत असल्याचेही ते म्हणाले. लोकायुक्तापासून कोणतीही माहिती लपविली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपली केरळमध्ये कोणतीही निनावी किंवा बेनामी संपत्ती नाही, असलेली संपत्ती ही वृषल इस्टेट अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहेत.
कंपनीच्या ई फायलिंगमध्येही त्याचा उल्लेख आहे. लोकायुक्तालाही आपण आपल्या संपत्तीविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. नियमानुसार 31 मार्च 2015 च्या आपल्या डिक्लरेशनमध्ये कॅश, बँक खाती, स्थायी आणि अस्थायी मालमत्ता, वाहने, दागिने याची सर्व माहिती देण्यात आली आहे. मालमत्तेसंबंधी चौकशी करण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी आपल्याला किमान 15 वेळा एसीबीत बोलावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
मालमत्ता ही बेहिशेबी नाही. ती घेण्यासाठी काढण्यात आलेले ५. ५० कोटी रुपयांच्या कर्जाचीही माहिती त्यांनी एसीबीला दिली असल्याचे सांगितले. या कर्जाबद्दलची सविस्तर माहिती एसीबीला देण्यात आली नाही हेही चुकीचे आहे. कर्ज घेतल्याची तारीख आणि इतर सर्व गोष्टी एसीबीकडे आहेत असेही ते म्हणाले एसीबीकडून पुरविण्यात आलेली माहिती ही दिशाभूल करणारी आणि खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुख्यता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना या बद्दल भलतीसलती माहिती देणे योग्य नाही. यामुळे आपली विनाकारण समाजात बदनामी होत आहे असा दावा त्यांनी केला आहे.