शेजारीच दहशतवादाची जननी

By admin | Published: October 17, 2016 04:05 AM2016-10-17T04:05:13+5:302016-10-17T04:05:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता, हा देश तर दहशतवादाची जननी, अशा शब्दांत हल्लाबोल केला.

Neighbors of terrorism | शेजारीच दहशतवादाची जननी

शेजारीच दहशतवादाची जननी

Next

सुशांत कुंकळयेकर,
बाणावली (मडगाव, दक्षिण गोवा)- पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधात संपूर्ण ब्रिक्स परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता, हा देश तर दहशतवादाची जननी, अशा शब्दांत हल्लाबोल केला. पाच राष्ट्रप्रमुखांच्या सकाळी झालेल्या शिखर बैठकीत मोदी यांनी हा हल्ला चढविला.
जागतिक राजकारणात ब्रिक्सचा प्रतिनिधी असलेल्या चीनने पाकिस्तानबाबत मवाळ धोरण स्वीकारलेले असतानाही ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचा आक्रमक प्रयत्न ब्रिक्सच्या या आठव्या परिषदेत करण्यात भारताला यश आले. जागतिक दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा निर्धार व्यक्त करताना ब्रिक्स देशांतर्गत व्यापारवृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या ठरावाने गोव्यातील या आठव्या ब्रिक्स परिषदेची सांगता झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप केला. दहशतवाद आता प्रादेशिक राहिला नसून जागतिक झाला आहे. दहशतवादामुळे केवळ वित्तहानी होते असे नसून एकूणच समाजाला आणि मानवतेला या दहशतवादाने ग्रासले आहे. त्यामुळे जागतिक दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा निर्धार सर्व ब्रिक्स देशांनी व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले. दहशतवादाला आसरा देणारे, तसेच त्यांना शस्त्र व वित्तसाहाय्य करणारेही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींविरुद्ध लढणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ब्रिक्स देशाच्या प्रमुखांनी एकमुखाने मान्य केले.
>भारत जगाची सर्वात खुली अर्थव्यवस्था
भारत आज मजबूत आर्थिक विकास दरासह जगाची सर्वात खुली अर्थव्यवस्था आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे ब्रिक्स व्यापार परिषदेत काढले. आमच्या सरकारने दोन वर्षात सुधारणांचे जे कार्यक्रम राबविले त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असेही ते म्हणाले.
व्यापार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, गत दोन वर्षात आम्ही अनेक सुधारणावादी पाऊले उचलली आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. आम्ही भारताला जगाच्या सर्वात खुुल्या अर्थव्यवस्थेत रुपांतरीत केले आहे. विकासाचा दर मजबूत आहे. हीच गती कायम ठेवण्यास आमचे प्रयत्न आहेत.
जीएसटीसारखे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटकाळी कंपनीला व्यवसाय सोडून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर ‘मेक इन इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ सारखे कार्यक्रम समोर ठेवले आहेत. त्यामुळे भारताची व्यवसायातील श्रेणी ३९ व्या स्थानावर आली आहे.
संरक्षण आणि विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढत आहे. पायाभूत विकास सुविधांकडेही सरकारचे लक्ष आहे. आगामी एका दशकात रस्ते, विमानतळ, बंदरे निर्मितीसाठी एक हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे.
>भारत-रशिया यांच्यात
गॅस पाईपलाईनसाठी करार
भारत आणि रशिया यांनी सायबेरियातून भारतात नैसर्गिक वायू वाहून आणण्यासाठी जगातील सर्वाधिक खर्चाची (२५ अब्ज अमेरिकन डॉलर) पाईपलाईन टाकण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. ४५०० ते ६००० किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाईपलाईनचा सगळ््यात जवळचा मार्ग हा हिमालयातून उत्तर भारतात असेल. त्यात अनेक तांत्रिक आव्हाने असतील. पाईपलाईन मध्य अशियन देशांद्वारे (इराण, पाकिस्तान) पश्चिम भारतात येईल. इराण-पाकिस्तान-भारत हा मार्ग जवळचा आणि स्वस्तातला असून त्याच्या तुलनेत वरील मार्ग हा खर्चिक व दूर अंतराचाही आहे.
>चीन भूमिकेवर ठाम
दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या मुद्यावर मतभेद असू शकत नाहीत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले असले तरी दहशतवादासह एनएसजी मुद्यावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भूमिकेत बदल झालेला दिसत नाही. जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्यावर संयुक्त राष्ट्राकडून बंदी आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरु आहेत. पण, चीनकडून याला खोडा घातला जात आहे. यावर भारताने आपली काळजी चीनपुढे व्यक्त केली. मोदी यांनी भारताची भूमिका शी जिनपिंंग यांच्यापुढे मांडली. पण, या मुद्यावर चीनच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत नाही.
>श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी
मोदींनी केली चर्चा
ब्रिक्स संमेलनासाठी आलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी
येथे चर्चा केली. या चर्चेनंतर व्टिट करताना मोदी यांनी म्हटले आहे की, मैत्रीाल सिरिसेना यांच्यासोबतची बैठक चांगली झाली. आमच्या महत्वाच्या मित्रांपैकी श्रीलंका एक आहे. आमचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आम्ही काम करत
आहोत.

Web Title: Neighbors of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.