ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:50 PM2022-12-05T13:50:06+5:302022-12-05T14:01:53+5:30
सचिवाच्या मनमानीचा निषेध म्हणून पंच सदस्याने दिला राजीनामा
अजय बुवा
दक्षिण गोवा - फोंडा बोरी ग्रामपंचायत क्षेत्रात एक अनोखा प्रकार उजेडात आला असून, काँक्रीटच्या पट्ट्या तीन बाजूने उभ्या करून केलेला एका आडोशाला पंचायत सचिवाने थेट घर क्रमांक दिला आहे.सचिवांच्या मनमानी व बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणून सदर प्रभागातील पंच सदस्य विनय पारपती यांनी चक्क राजीनामा दिल्याची घटना यामुळे घडली आहे.
सविस्तर वृत्तानुसार बोरी बायथेखोल सर्कल जवळ एका इसमाने फक्त तीन बाजूनी मोजून 12 काँक्रीटच्या पट्ट्या उभ्या करून एक आडोसा उभा केला आहे. त्याला ना छप्पर ना दरवाजा, ना भिंती ना खिडक्या .घर म्हणताना ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. सदरच्या आडोशाला घर कसे म्हणावे हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. परंतू सचिवांना त्याचे काहीच पडून गेले नाही. प्रत्येक घरात असलेल्या एका लहानशा बाथरूम एवढे क्षेत्रफळ असलेले हे बांधकाम असून, सदरची फाईल पंचायत सचिवा जवळ येताच त्या जागेची पाहणी न करताच थेट घर क्रमांक देऊन टाकला आहे. सदर प्रभागाचे पंच सदस्य विनय पारपती यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी पंच सदस्य सतीश बोरकर व सुनील बोरकर यांच्यासह सदर बांधकामाची पाहणी केली असता त्यांना तेथे घर म्हणतात असे काहीच आढळून आले नाही. पंचायत सचिवांनी घर क्रमांक देताना सदरची गोष्ट अगोदर पंच सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती. परंतु सचिवाने कुणालाच विश्वासात न घेता सदर बांधकामाला घर क्रमांक दिला आहे असा आरोप पंच सदस्य करत आहेत.
सोमवारी विनय पारपती यांनी पत्रकारांना त्या ठिकाणी बोलावून सदर प्रकारावर उजेड टाकला. सदरच्या आडोशाला घर क्रमांक दिल्याचे पाहून पत्रकार सुध्दा आश्चर्यचकित झाले. यावेळी बोलताना विनय पारपती म्हणाले की ' पंचायत सचिव रुपेश हळर्णकर हे मनमानी कारभार करत आहेत. तीन बाजूने नुसत्या लहानशा काँक्रीटच्या पट्ट्या उभ्या करून जो आडोसा निर्माण केला आहे, त्याला घर क्रमांक देण्याअगोदर पंचायत सचिवांनी पाहणी करायला हवी होती. पंच सदस्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. आज सदरच्या आडोशाला घर म्हणून क्रमांक दिल्याने लोक आमच्या कार्यपद्धतीवर शंका घेत आहेत. ह्या घर क्रमांक संदर्भात पंचायत सचिव आमचे काहीच न ऐकत असल्याचे लक्षात येताच निषेध म्हणून मी थेट पंच सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारने सदर पंच सदस्य सचिवावर कारवाई करावी. पंचायत संचालक कार्यालयातील लोकांनी येऊन घराच्या नावाखाली जे काम उभे केले आहे, त्याची पाहणी करावी व नंतरच याला घर म्हणतात की आणखीन काय म्हणतात ते ठरवावे.