येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2024 11:29 AM2024-12-08T11:29:16+5:302024-12-08T11:29:51+5:30
गोवा भेटीवर आलेल्या सिंह यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्याचे नवीन प्रदेशाध्यक्ष हे जानेवारी २०२५ मध्ये ठरणार असल्याची माहिती भाजपचे राज्यसभा सदस्य अरुण सिंह यांनी सांगितले. गोवा भेटीवर आलेल्या सिंह यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंत शेट तानावडे, माजी आमदार दामू नाईक व सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. ते म्हणाले की, नवीन राज्य कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर पर्यंत राज्यातील सर्व मंडल अध्यक्षांची तसेच जिल्हा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तसेच जानेवारी २०२५ पर्यंत प्रदेशाध्यक्षांचीही निवड होणार आहे.
देशात भाजपने सुरू केलेल्या सदस्यता मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत देशभरात १२ कोटी सदस्य झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला मान्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती साधली आहे. पंतप्रधानाच्या यशामुळे भाजपला लोकांचा पाठिंबा वाढताना पाहून काँग्रेससारखे विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त बनले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.