नव्या घडामोडीत फॉरवर्डची हानी, विजय-खंवटेंना चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 06:33 PM2019-07-11T18:33:04+5:302019-07-11T18:38:43+5:30

काल तुला, आज मला या म्हणीचा प्रत्यय ताज्या राजकीय घडामोडींमुळे गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना आला आहे.

New Harmonious Forward Harms, Vijay-Khnavtena Arc | नव्या घडामोडीत फॉरवर्डची हानी, विजय-खंवटेंना चाप

नव्या घडामोडीत फॉरवर्डची हानी, विजय-खंवटेंना चाप

Next

पणजी : काल तुला, आज मला या म्हणीचा प्रत्यय ताज्या राजकीय घडामोडींमुळे गोवा फॉरवर्ड पक्षाला आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना आला आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची शकले उडवलीच पण दहा आमदारांना भाजपमध्ये घेऊन गोवा फॉरवर्डचीही हानी केली आहे. फॉरवर्डच्या तिघांचेही मंत्रिपद गेले तर विजय सरदेसाई यांच्यासाठी तो मोठा धक्का असेलच, शिवाय अपक्ष रोहन खंवटे हेही मंत्रीपद गमावत असल्याने खंवटे यांचीही राजकीय हानी अटळ ठरत आहे.

मार्च 2017 मध्ये सरदेसाई, खंवटे आदींनी जनमतामधील प्रवाहाविरुद्ध जात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. भाजपमधील त्यावेळच्या पराभूत माजी आमदारांना सत्तेसाठीचे ते गठबंधन आवडलेच नव्हते. त्यांच्या कुरबुरी सुरूच होत्या पण मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असेपर्यंत पक्ष संघटनेकडूनही सगळे काही सहन केले जात होते. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले व संघटनमंत्री म्हणून सतीश धोंड यांनी भाजप संघटनेचा पूर्ण ताबा घेतल्यानंतर गोव्यात पूर्णपणो भाजपचेच सरकार अधिकारावर असावे असा विचार पुढे आला. केंद्रात मोदी सरकार भक्कम बनल्यानंतर आता घटक पक्षांची गरज नाही अशा विचाराप्रत भारतीय जनता पक्ष आला. गोवा फॉरवर्डच्या तिघांना मंत्रिपदे देणे हे भाजपच्या संघटनेला कधीच रुचले नव्हते.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्यासाठी विनोद पालयेकर यांनी मंत्रिपद सोडावे, असा प्रस्ताव अगोदर भाजपने विजय सरदेसाई यांना दिला होता. तथापि, जयेश साळगावकर, पालयेकर व सरदेसाई हे संघटीत राहीले व त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली नाही. याच दरम्यान भाजपची काँग्रेसमधील दहा आमदारांशी बोलणी वाढली. बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचे धोंड यांना गेल्या आठवड्यात कळविले. तत्पूर्वी विदेशात क्रिकेट सामना पाहायला जाताना मोन्सेरात यांनी आपण सगळे मिळून काँग्रेसचे सरकार अधिकारावर आणूया असे सरदेसाई यांना सांगितले होते. मगो पक्षाची जी स्थिती झाली, तीच गोवा फॉरवर्डचीही होईल, तत्पूर्वीच आम्ही काँग्रेसचे सरकार आणूया असे बाबूशने सरदेसाईंना सांगितले होते पण केंद्रात भाजपची आक्रमक राजवट असल्याने सरदेसाई यांनी होकार दिला नव्हता. बाबूशने शेवटी धोंड, बाबू कवळेकर व लोबोंशी चर्चा करत भाजपमध्ये जाण्याची योजना अंमलात आणली. तत्पूर्वी चार दिवसांपूर्वीच धोंड हे भाजपचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष यांच्याशी आणि रामलाल यांच्याशीही बोलले होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमला काही गोष्टींची कल्पना दिली होती. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते सरदेसाई यांच्यासोबत आपण जास्त काळ काम करू शकणार नाही, आपल्याला मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलवावी असे काहीवेळा वाटत नाही, आपल्याला काही गोष्टींचा उपद्रव होतोय असे सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितले होते. त्यावर नगर नियोजन खाते तुम्ही काढून घ्या अशी भूमिका कोअर टीमच्या काही सदस्यांनी घेतली होती. गोवा फॉरवर्डला आज शुक्रवारी अधिकृतरित्या बाजूला केल्यानंतर व अपक्ष खंवटे यांनाही डच्चू दिल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिक भक्कम होईल, असे सर्वसाधारणपणो मानले जाते. मात्र बाबूश मोन्सेरात यांनी किंवा अन्य मंत्र्यांनी नजिकच्या भविष्यात कुरबुरी सुरू केल्या तर 27 आमदारांना घेऊन भाजपाने उभा केलेला डोलारा हा अडचणीतही येऊ शकतो. अर्थात केंद्रात भक्कम असे मोदी सरकार असल्याने मुख्यमंत्री निश्चिंत आहेत, असे भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे पाच आमदार, त्यातील चार माजी मुख्यमंत्री, गोवा फॉरवर्ड, मगोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव, अपक्ष खंवटे, सांगेचे प्रसाद गावकर या सर्वाना भाजपने आता एका पातळीवर आणून ठेवले आहे. अजून विद्यमान विधानसभेचा पावणे तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तथापि, काँग्रेसमधील एकदम दहा आमदारांना भाजपमध्ये घेणे हे भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. दिलीप परुळेकर किंवा दयानंद मांद्रेकर किंवा दामू नाईकही खूश होतील, पण भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते सगळीकडे आहेत, त्यातील अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असे चित्र सोशल मिडियावर अनुभवास येते. विद्यमान सरकार हे बहुजन समाजाचे आहे असाही संदेश देण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे भाजपमधील एक गट मानतो.

Web Title: New Harmonious Forward Harms, Vijay-Khnavtena Arc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.