दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 07:15 AM2024-05-30T07:15:49+5:302024-05-30T07:16:57+5:30

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले.

new mp will be declared by 1 pm the election commission system is ready for vote counting for goa lok sabha election 2024 | दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ४ जून) होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी सांगितले.

उत्तर गोव्यात मतमोजणी आल्तिनो येथील गोवा पॉलिटेक्निक कॉलेज तर दक्षिण गोव्यातील मतमोजणी ही मडगाव येथील दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स येथे होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मुख्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले.

वर्मा म्हणाले की, उत्तर गोव्यात ६५० व दक्षिण गोव्यात ६५० असे मिळून एकूण १३०० कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामासाठी नियुक्ती केली आहे. यात प्रत्येकी १५७ निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. स्ट्राँग रूमपासून ते मतमोजणी केंद्रांपर्यंत ईव्हीएम मशिन्स सुरक्षितरीत्या नेण्यासाठी खास कॉरिडॉर तयार केले जातील. लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सात ते आठ फेऱ्यांमध्ये होईल, असे त्यांनी सांगितले.

पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली जाईल. पोस्टल बॅलेटनंतर ईव्हीएम मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीवेळी पाऊस पडला तर कुठलाही अडथळ येऊ नये व मतमोजणी सुरळीतपणे व्हावी, यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जाईल. त्यानुसार दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे, असे वर्मा यांनी सांगितले.

मोबाईल आणण्यास बंदी

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन येण्यास बंदी असल्याचे सांगितले आहे. जर मोबाईल आणला तर तो जप्त करून मतमोजणीनंतर परत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मशीनमधील मतमोजणी पूर्ण होईल परंतु व्हीव्हीपॅट मतमोजणी दुपारी दीड वाजेपर्यंत पूर्ण होईल.

मडगावात दुपारीच उधळणार गुलाल

मंगळवारी (दि. ४ जून) होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून २० मतदारसंघासाठी सभागृहात १६५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दुपारी एक-दीड वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. पोस्टल बॅलेट मतमोजणी ८ वाजता होणार आहे. ४ ते ५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांनी दिली.

मतमोजणीच्या ठिकाणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्वीन चंदू ए. यांनी भेट देऊन आढावा घेतला. ही मतमोजणी दामोदर महाविद्यालयात होणार आहे. यासाठी १२९० कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर ७०० पोलिसांचा बंदोबस्त असेल. यात ४०० पोलिस, १०० सीआरपीएफ व २०० वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. ५५० मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी एक हजार चौ. मीटर जागेत मंडप उभारण्यात येणार आहे व त्यात मोठी स्क्रीन बसविण्यात येणार आहे.

 

Web Title: new mp will be declared by 1 pm the election commission system is ready for vote counting for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.