गोव्यात नववर्षाच्या जल्लोषामुळे फुटपाथवर काचा आणि कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:35 AM2020-01-02T02:35:01+5:302020-01-02T02:35:07+5:30
रस्त्यांवरच पार्ट्या; समुद्रकिनाऱ्यांवर रात्री झाली आतषबाजी
पणजी : गोव्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री साजऱ्या झालेल्या नववर्षामुळे बुधवारी सकाळी पणजी शहरातील अनेक फुटपाथवर फुटलेल्या बाटल्या आणि कचºयाचा खच दिसून आला.
देश-विदेशातील लाखो पर्यटक अजून गोव्यात आहेत. त्यांनी नववर्ष गोव्यात साजरे केले. रात्री मेजवानीचे कार्यक्रम पार पडले. अनेक गोमंतकीयांनी संकल्प दिवस साजरे केले. पर्यटकांसह गोमंतकीयांनीही रात्र जागली. तरीही पणजी ते मिरामार ते दोनापावलपर्यंतच्या फुटपाथवर अनेक गोमंतकीय सकाळी उठून चालायला निघालेले दिसते.
दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री येथे वाहन अपघात होतात. यंदा केवळ एकच अपघात झाला. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी आहे. तथापि, उत्साही तरुण व पर्यटकांनी रात्री रस्त्याच्या बाजूलाच पार्ट्या केल्या आणि तिथेच रिकाम्या बाटल्या फेकल्या आणि खाद्यवस्तूंची पाकिटे फेकली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या सकाळी शहरात ठिकठिकाणी कचरा दिसत होता.
अनेक नामवंतांचे पर्यटन
मंगळवारी रात्रीपासून स्थानिकांबरोबरच देशी व परदेशी पर्यटकांनी शहरांत ठिकठिकाणी आणि समुद्र किनाऱ्यांवर जल्लोष केला. कळंगूट, कांदोळी, मिरामार या समुद्र किनाºयांवर डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी पाहायला मिळाली. आयर्लंडचे पंतप्रधान लिवो वराडकर यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्तींनी गोव्यात नववर्ष साजरे केले. काही राज्यांतील मंत्री, आमदार, उद्योगपती, बॉलिवूडचे काही कलाकार हेही गोव्यात होते.