Goa Election Result 2022: गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? प्रमोद सावंत दिल्लीला रवाना; भाजपमधील शीतयुद्ध शमणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:13 PM2022-03-15T16:13:33+5:302022-03-15T16:13:54+5:30
गोवा भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर प्रमोद सावंत यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
पणजी: गोवा विधासभा निवडणुकांचा निकाल (Goa Election Result 2022) भाजपच्या बाजूने लागला. भाजपने गोव्यात निर्भेळ यश मिळवत २० जागा जिंकल्या. भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले असून, अन्य अपक्ष उमेदवारांनीही पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. यातच गोवा विधानसभेत सर्व नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यावेळी हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती. यानंतर आता प्रमोद सावंत दिल्लीला रवाना होऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वात भाजपने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत असताना विश्वजित राणे (vishwajit rane) यांनी प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिल्याने आता गोवा भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निकाल लागून पाच दिवस उलटले तरी भाजपला गोव्यात सत्ता स्थापन करता आलेली नाही.
राणे आणि सावंत वाद दिल्ली दरबारी
विश्वजित राणे यांच्यातील शीतयुद्ध दिल्ली दरबारी पोहोचला आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार असून, गोव्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद जाते की विश्वजीत राणे यांना संधी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याची चर्चा आहे.
नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांच्याकडे सूत्रे सोपवून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये १७ आमदारांनी इंग्रजी, १५ जणांनी कोकणी, तर ७ आमदारांनी घेतली मराठीतून शपथ घेतल्याची माहिती मिळाली आहे. तत्पूर्वी, निवडणूक निकालानंतर प्रमोद सावंत पहिल्यांदाच दिल्लीला जात असून, यावेळी भाजपच्या अन्य नेत्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गोव्यात भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठीचे बहुमत आहे. भाजपचे २०, अपक्ष ३ आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ असे एकूण २५ आमदारांचे संख्याबळ पक्षाकडे आहे. मात्र, नवनिर्वाचित आमदार आणि माजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शीतयुद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.