मूर्ती तोडफोड प्रकरणी फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय तडीपार प्रकरणाची पुढील सुनावणी 18 डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:55 PM2019-10-07T18:55:22+5:302019-10-07T18:55:32+5:30
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यासंबंधीची शिफारस केली होती
मडगाव: धार्मिक मूर्ती तोडफोड प्रकरणी फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याची तडीपार प्रकरणी पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई या प्रकरणी सरकार पक्षातर्फे बाजू मांडत आहेत. बॉय याच्या विरुद्ध सध्या सुरु असलेल्या दखलपात्र गुन्हय़ांविषयींची माहिती सादर करण्याची सुचना दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी सरकारी अभियोक्ता देसाई यांना केली असून 18 डिसेंबर रोजी या प्रक़रणी युक्तीवाद होईल.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याला दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यासंबंधीची शिफारस केली होती. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या व अन्य कारणांमुळे ही सुनावणी रखडली होती. बॉय याच्याविरुद्ध अनेक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप असून काही प्रकरणांतून तो निदरेषही सुटला आहे.
बॉय याच्याविरद्ध कुडचडे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेली तीन प्रकरणो तसेच मायणा-कुडतरी व कुंकळ्ळी पोलिसांनी दाखल केलेले प्रत्येकी एक अशी एकूण पाच प्रकरणो सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. यापूर्वी केपे पोलिसांतर्फे दाखल केलेली चार व मडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या चार प्रकरणांतून सबळ पुराव्याअभावी बॉय याची निदरेष मुक्तता झाली होती. 14 जुलै 2017 रोजी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर सुमारे 150 धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यातील काही प्रकरणात तो न्यायालयात निदरेषही सुटला आहे. कुडचडे येथील बॉय हा टॅक्सीची भाडी मारत होता. रात्रीच्यावेळी तो धार्मिक स्थळांची मोडतोड करीत असे असा पोलिसांचा आरोप होता. गोव्यात मागच्यावर्षी धार्मिक स्थळांची विशेषता क्रॉस मोडतोडीची अनेक प्रकरणो घडली होती. पोलिसांनी खास चौकशी पथक तपासासाठी तयार केले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर बॉयला अटक केली होती.