Night curfew: ख्रिसमस, न्यू ईयरच्या तोंडावर गोव्य़ात रात्रीची संचारबंदी? मुख्यमंत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:17 PM2020-12-24T18:17:37+5:302020-12-24T18:18:18+5:30
Goa news on Night curfew: इंग्लंडमधूनही अलिकडे अनेक प्रवासी गोव्यात आले. गोव्यात कोविडविषयक चाचणी अधिक कडकपणे अंमलात आणणे व संबंधित व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे असे मत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी याविषयी बोलताना व्यक्त केले.
पणजी : राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नाही असे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
कर्नाटक सरकारने रात्रीची संचार बंदी लागू केली होती पण ती लगेच मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. लोकांच्या प्रतिक्रियांनंतर ती मागे घेतली गेली. महाराष्ट्र सरकारने मात्र रात्रीची संचारबंदी कायम ठेवली आहे. गोवा हे पर्यटन राज्य आहे व येथे देश- विदेशातून पर्यटक नाताळ साजरा करण्यासाठी तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी सध्या येत आहेत. राज्यात रोज सरासरी शंभर नवे कोविड रुग्णही आढळून येत आहेत.
पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यात तरी रात्रीची संचारबंदी किंवा जनता कर्फ्यू लागू करण्याचा सध्या प्रस्ताव नाही. तसा आमचा विचार नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जी काही एसओपी येईल त्याचे आम्ही पालन करू. आम्ही नव्या एसओपीच्या प्रतिक्षेत आहोत.
दरम्यान, इंग्लंडमधूनही अलिकडे अनेक प्रवासी गोव्यात आले. गोव्यात कोविडविषयक चाचणी अधिक कडकपणे अंमलात आणणे व संबंधित व्यवस्था वाढविणे गरजेचे आहे असे मत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी याविषयी बोलताना व्यक्त केले. गोव्यात जे लोक परराज्यांतून येतात, त्यांची चाचणी ही व्हायलाच हवी असे ते म्हणाले.