काब्राल आक्रमक; राजीनामा देणार नाही, आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र बाशिंग बांधले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:59 AM2023-11-19T08:59:58+5:302023-11-19T09:00:46+5:30

शपथविधी येत्या महिन्यात शक्य

nilesh cabral aggressive and not going to resign | काब्राल आक्रमक; राजीनामा देणार नाही, आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र बाशिंग बांधले

काब्राल आक्रमक; राजीनामा देणार नाही, आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र बाशिंग बांधले

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर पोलिसांत कोणताच गुन्हा नाही किंवा न्यायालयातही खटला नाही. तरीदेखील आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काब्राल यांचा राजकीयदृष्ट्या बळी देण्याचा प्रयत्न भाजपमधून सुरू आहे. याबाबत, काब्राल यांनी मात्र आपण राजीनामा देणार नाही, वाटल्यास आपल्याला मंत्रिमंडळातून काढा, असा संदेश भाजपच्या काही नेत्यांना पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बाशिंग बांधले आहे. येत्या महिन्यात सिक्वेरा यांचा शपथविधी होऊ शकतो. मात्र, काब्राल यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची कृती भाजपने केली, तर ती जड जाऊ शकते.

काब्राल यांना लोकांची सहानुभूती मिळू शकते, अशी स्थिती आहे. कारण, काब्राल यांनीही काल विधान केले की, आपल्यावर बलात्कार किंवा फसवणुकीचा गुन्हा नाही. काब्राल यांनी असे विधान करून मंत्रीमंडळातील दोघा मंत्र्यांच्या शेने बाण मारला आहे. दोघा मंत्र्यांविरुद्ध बलात्कार व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा आहे. ते न्यायालयात हेलपाटेही मारत आहेत. त्यांना न वगळता चक्क काब्राल यांना वगळले जाणार असल्याने वादाचा विषय बनला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सिक्वेरा यांना मंत्रिपद द्यायला हवे, अशी भाजपच्या हायकमांडची भूमिका आहे. कारण तसा शब्द सिक्वेरा यांना काँग्रेसमधून फोडताना दिला गेला. नवा ख्रिस्ती मंत्री मंत्रिमंडळात घेण्यासाठी अगोदर एखाद्या ख्रिस्ती मंत्र्यालाच वगळा, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केली. ती मान्य करून भाजप श्रेष्ठीनी काब्राल यांचा राजीनामा मागितला आहे. काब्राल मात्र राजीनामा देण्याच्या तयारीत नाहीत. सिक्वेरांचे अच्छे दिन जवळ आले आहेत. ३ डिसेंबरपर्यंत त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशी चर्चा नुवेत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, 'ठरल्यास तुम्हाला कळवू'

दरम्यान, मंत्री काबाल यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लावणार काय? असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काल पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या विषयावर स्पष्ट बोलणे टाळले. तसे काही ठरले तर तुम्हाला कळवू, असे सांगून ते निघून गेले.

बळीचा बकरा करू नका

मंत्रिमंडळातील काही मंत्रीही काब्राल यांच्या पाठीशी आहेत. काब्राल यांना बळीचा बकरा बनविले जाऊ नये, असे काही मंत्र्यांना वाटते. दरम्यान, काबाल यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना 'आपल्याविरुद्ध जर कोणता आरोप असेल तर सिद्ध करा. मग मी राजीनामा देईन,' अशी प्रतिक्रिया दिली. काब्राल म्हणाले, माझ्याविरुद्ध बलात्कार किंवा फसवणुकीचा गुन्हा नाही. मी लाच वगैरे घेतल्याचा आरोप असेल तर सिद्ध करा. मग, मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिपद व आमदारकीचा राजीनामा देईन.' माझा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितलेला नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मंत्रिपद मिळाले तर घेईन

याविषयी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना विचारले असता ते म्हणाले की, 'मला मंत्रिमंडळात घेत असल्याच्या बातम्या माध्यमांकडूनच मी यापूर्वीही अनेकवेळा ऐकत आलो. आताही ऐकत आहे. मुख्यमंत्र्यांनीही किंवा केंद्रीय नेत्यांनीही काहीच सांगितलेले नाही. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो, परंतु, ते लोटली पुलाविषयी. आणखी काहीच बोलणे झाले नाही. मी मंत्रिपदाची मागणीही केली नाही आणि मला पदाचे आश्वासनही दिले नव्हते, असेही ते म्हणाले. मात्र मंत्रिपदाची ऑफर दिली तर निश्चितच स्वीकारणार असे सिक्वेरांनी सांगितले.

कब्राल अजून दिल्लीत

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी यापूर्वी काब्राल यांना दिल्लीस बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. काब्राल मुख्यमंत्री सावंत यांनाही दोन दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली असून तिथे काही नेत्यांना ते भेटले. मी २०१२ पासून भाजपमध्ये आहोत व एकही गंभीर गुन्हा आपल्याविरोधात नोंद नाही, तरीदेखील राजीनामा मागणे हा अन्याय ठरतो, अशी कल्पना काब्राल यांनी नेत्यांना दिली. 

दिगंबर व संकल्पही रांगेत

दरम्यान, काब्राल यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची शस्त्रक्रिया यापुढील दिवसांत यशस्वी झाल्यानंतर मग आणखी दोघा मंत्र्यांच्या हाती नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. दिगंबर कामत (मडगाव) व संकल्प आमोणकर (मुरगाव) या दोन आमदारांनाही पूर्वी मंत्रिपदाची आश्वासने दिल्लीहून दिली गेली आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. संकल्प यांना मंत्रीपद देण्यासाठी उत्तर गोव्यातील एका मंत्र्याला वगळले जाईल, अशी माहिती नव्याने चर्चेत आली आहे. मंत्रीपद मिळेल या अपेक्षेने संकल्प यांनी कोणतेच महामंडळ स्वीकारलेले नाही.

 

Web Title: nilesh cabral aggressive and not going to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.