माझे तिकीट लोक ठरवतील, पक्ष नव्हे! नीलेश काब्राल यांची आक्रमक भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:01 AM2023-11-28T11:01:40+5:302023-11-28T11:03:33+5:30

लोकसभेसाठी राज्यभर फिरलो असतो, आता मर्यादा

nilesh cabral aggressive and said people will decide my candidature not the party | माझे तिकीट लोक ठरवतील, पक्ष नव्हे! नीलेश काब्राल यांची आक्रमक भूमिका 

माझे तिकीट लोक ठरवतील, पक्ष नव्हे! नीलेश काब्राल यांची आक्रमक भूमिका 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: माझे तिकीट लोक ठरवतील पक्ष नव्हे, असे रोखठोक विधान मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले आमदार नीलेश काब्राल यांनी केले आहे. ते आता हळूहळू आक्रमक बनत असल्याचे एकूणच त्यांच्या विधानांवरुन स्पष्ट होत आहे.

एका मुलाखतीत बोलताना काब्राल म्हणाले की, कुडचडे मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर मी सुरुवातीला निवडणूक लढवली ती लोकांच्या जीवावरच तेव्हा भाजपसाठी जेमतेम दीडेक वर्षच मी काम केले होते. परंतु लोक माझ्यासोबत आहेत हे पाहूनच पक्षाने त्यावेळी मला उमेदवारी दिलेली.
कुडचडेत भाजपमध्ये पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या हालचाली चालू असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता काब्राल म्हणाले की, कोणीही आले तरी माझे स्थान भक्कम आहे. माझ्यासोबत लोक आहेत. माझी परिस्थिती इतरांसारखी होणार नाही. उलट आता मी मंत्री नाही. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मतदारसंघात माझी पाळेमुळे आणखी मजबूत करण्यासाठी वावरेन.

एका प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मंत्रिपदावरुन मला काढले तरी मी भाजपसोबतच आहे हे मी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. मंत्री असतो तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचारासाठी गोवाभर फिरलो असतो. आता आमदार म्हणून माझे कार्यक्षेत्र केवळ मतदारसंघापुरते मर्यादित आहे.

बांधकाम खात्यातील भरती प्रकरणी कथित घोटाळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पैसे घेऊन नोकऱ्या देण्याची माझी वृत्ती नाही. राजीनामा दिल्यानंतर हजारो मेसेज राज्यभरातून आले. भरतीबद्दल माझे विरोधकही मला क्लीन चिट देतात. खिस्ती आमदाराला मंत्री बनविण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला वगळणे हे योग्य आहे का?, असा प्रश्न केला असता काब्राल म्हणाले की, असे भाजपत कधी घडले नाही. पायउतार होण्यास सांगितल्यावर मी मुकाट्याने मान्य करणार हे माहीत होते म्हणून कदाचित मला सांगितले असावे. 

काब्राल यांनी आपल्याविरुद्ध कारस्थान शिजल्याचा आरोप केला होता त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मला थेट केंद्राकडून पायउतार होण्यास सांगितले त्यावरुन गोव्यातूनच माझ्याबाबत कारस्थान शिजले व केंद्रीय नेत्यांचे कान भरल्याचे स्पष्ट होते. मी रोखठोक बोलतो म्हणून माझा काटा काढला असावा. एक लक्षात ठेवा, मी संघाचा नसलो तरी राष्ट्रवाद अंगात भिनलेला आहे. तामनार, दुहेरी रेल्वे मार्ग, कचरा प्रकल्प यामुळे माझी मते कमी झाली. परंतु राष्ट्रीय प्रकल्पांबाबत कधी माघार घेतली नाही.

लोकसभेसाठी मी नाही

लोकसभा उमेदवारी दिली तर स्वीकारणार का?, या प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मी आमदार म्हणूनच समाधानी आहे. लोकसभेचा वगैरे विचार करत नाही. अजून मी तरुण आहे आणि तळागाळात वावरण्याची माझी तयारी आहे. कुडचडे मतदारसंघाचा मतदार नसतानाही मला लोकांनी निवडून आणले. मी केंद्रात वगैरे जाऊ नये, असे लोकांनाही वाटते. मी माझ्या मतदारसंघातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.

 

Web Title: nilesh cabral aggressive and said people will decide my candidature not the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.