पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By समीर नाईक | Published: November 19, 2023 03:41 PM2023-11-19T15:41:36+5:302023-11-19T15:42:32+5:30
आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री मंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते.
समीर नाईक, पणजी: मंत्री निलेश काब्राल यांना पक्षाने तथा मी वैयक्तिक स्तरावर राजीनामा देण्याची विनंती केली होती, त्या विनंतीस मान देऊन पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा राज्यपालकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री मंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते, त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली असल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये, काब्राल यांच्यावर कुठलाही आरोप नाही, तसेच आरोप होत असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलेले नाही, हे लोकांनी समजून घ्यावे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
निलेश काब्राल हे भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य आहे, त्यामुळे जो निर्णय पक्ष घेत आहे तो त्यांना मानावा लागतो. यापूर्वी देखील अनेकांनी त्याग केला आहे. त्यांना पक्षाची इतर काही जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्यपाल यांनी काब्राल यांचा राजीनामा स्वीकारला असून सिक्वेरा यांची आजच शपथविधी होणार आहे. काब्राल यांच्याकडे जी जबाबदारी होती, तीच जबाबदारी सिक्वेरा यांना देण्यात येणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी अधिक माहिती देताना सांगितले.