पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:15 AM2023-11-20T08:15:03+5:302023-11-20T08:17:01+5:30

सिक्वेरा यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा भरजरी मुकूट घातला गेला. 

nilesh cabral was forced to step down | पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले 

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले 

काँग्रेस पक्षातून जे आठ आमदार गेल्या वर्षीं भाजपमध्ये आले, त्यांच्यापैकी दोघांना तरी मंत्रिपद दिले जाईल हे स्पष्ट होतेच. तूर्त काल एकाला मंत्रिपद दिले गेले. आलेक्स सिक्वेरा यांची राजकीय कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. अशावेळी भाजपने आपला तथाकथित शब्द राखण्यासाठी म्हणून काल आलेक्स यांना मंत्रिपद दिले. त्यासाठी चक्क बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. काब्राल आज ५१ वर्षांचे आहेत आणि नवे मंत्री सिक्वेरा ६४ वर्षांचे आहेत. एक थकलेला नेता मंत्री म्हणून स्वीकारा असे भाजपने गोमंतकीयांना सांगितल्यासारखे झाले आहे. कार्यक्षमतेबाबतही काब्राल आणि सिक्वेरा यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही. बाबूश मोन्सेरात किंवा माविन गुदिन्हो यांच्या पदांना हात न लावता कुडचडेचे आमदार काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले गेले. सिक्वेरा यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा भरजरी मुकूट घातला गेला. 

अनेकांना कुडचडे मतदारसंघात तरी काल कदाचित पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा हे गाणे आठवले असेल. काब्राल हे काही सर्वगुणसंपन्न होते किंवा आहेत असे नाही. पण भाजप सरकारमधील सध्याच्या काही अकार्यक्षम मंत्र्यांसारखे तरी काब्राल निष्क्रिय नव्हते. विषयांची, प्रश्नांची चांगली समज त्यांना मंत्री या नात्याने होती. बांधकाम खात्यातील कायमची वादग्रस्त नोकर भरती हा वेगळा विषय आहे. सध्या सज्जनांसारखे दाखविणारे अनेक मंत्री कोणते पराक्रम करत आहेत हे गोमंतकीय जनतेला ठाऊक आहे. काब्राल हे स्पष्ट बोलणारे व काहीवेळा अती बोलून वाद ओढवून घेणारे होते. पण ते वर्कहोलिक होते व आहेत हे मान्य करावे लागेल. आपल्या खात्यातील अधिकारी, अभियंते काम करत नाहीत असे आढळून आले की भर बैठकीत त्यांना फैलावर घेणारे काब्राल होते. काम व्हायलाच हवे असा त्यांचा आग्रह असायचा. कुडचडे मतदारसंघातून त्यामुळेच ते तीनवेळा निवडून येऊ शकले हे कबूल करावे लागेल.

काब्राल परवा नाराजीने बोलले की आपल्याविरुद्ध बलात्कार किंवा भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद नाही. म्हणजे त्यांना सुचवायचे होते की ज्यांच्याविरुद्ध असे गुन्हे आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केले जात नाही पण आपल्याला गुड बाय केले जात आहे. काब्राल यांची खंत खरीच आहे. त्यामुळेच भाजपा, अजब तुझे सरकार म्हणावे लागेल. देशभरच सध्या मूळ भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

निष्ठावान भाजप कार्यकर्ते व नेते यांना पक्षात सध्या अंग चोरून बसावे लागत आहे आणि जे दिगंबर कामत, आलेक्स किंवा संकल्प आमोणकर वगैरे पक्षात येतात त्यांची आरती गावी लागत आहे. काब्राल यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे काम भाजपच्या केंद्रीय श्रेष्ठींनी केले पण बाबूशसारखे जे मंत्री भाजप संघटनेचे काम देखील करत नाहीत किंवा मुख्यमंत्री आले तरी आपण पणजीतील कार्यक्रमांना येत नाहीत, त्यांना पक्षाकडून निवडणुकीवेळी दोन तिकिटे दिली जातात. त्यासाठी मग मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्यावर देखील अन्याय केला जातो. काल काब्राल यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या सूचनेवरून राजीनामा दिला व मग त्यांनी मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली, आपण पर्रीकर यांच्यामुळे भाजपमध्ये आलो होतो. तीनवेळा आमदार झालो व पक्षाने आदेश देताच मंत्रिपद सोडले असे काब्राल म्हणाले. 

२०१२ साली विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांची लाट आली होती. त्यावेळीच प्रथम काब्राल, मायकल लोबो, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ग्लेन टिकलो वगैरे निवडून आले. आलेक्स सिक्वेरा यांना सिंहासनावर बसविले म्हणून लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपची मते वाढतील असे कुणीच समजू नये. तसे होणार नाही हे पक्षालाही ठाऊक असेल. यापुढे दिगंबर कामत किंवा आणखी कुणाला मंत्रिपद देण्यासाठी सध्याच्या मंत्र्यांना हात लावला गेला तर मात्र सावंत यांच्या नेतृत्वाविरुद्ध असंतोष वाढू शकतो. तूर्त आलेक्सना मणीहार दिला तेवढे पुरे!

 

Web Title: nilesh cabral was forced to step down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा