गोव्यातील पेडामळ-शेल्डेत नऊ वाहनांची तोडफोड; गावात तणावपूर्ण वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:17 PM2023-12-08T14:17:31+5:302023-12-08T14:18:06+5:30
गावात विविध ठिकाणी घरांसमोर पार्क केलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.
केपे : पेडामळ-शेल्डे येथे अज्ञाताने नऊ वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघड झाला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. पहाटेच्या सुमारास नऊ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, यात सहा वाहनांचे अधिक नुकसान झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडामळ येथील मुस्लिमवाड्यात नऊ वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. यापैकी सहा वाहनांचे जास्त नुकसान झाले आहे. वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार पहाटे तीन ते चार यांदरम्यान घडला असावा असा संशय आहे. मात्र, ग्रामस्थांनी याबद्दल कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
गावात विविध ठिकाणी घरांसमोर पार्क केलेल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. दगड आणि जड वस्तूंचा वापर करून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दगडांचा अथवा जड वस्तूंचा वापर करून काही कारच्या पाठीमागील काचा फोडण्यात आल्या आहेत. स्थानिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी याबाबत केपे पोलिसांना कळवले. केपे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सकाळी येऊन वाहनांचा पंचनामा केला. दरम्यान, केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर म्हणाले की, गावातील दोन गटातील मतभेदांतून हा प्रकार घडला असावा असा संशय आहे. पेडामळ येथील दोन गटांमध्ये वाद आहेत. त्यातून हा प्रकार केला गेला असावा. याबद्दल आमची चौकशी चालू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी व्यक्त केला.