नव्वद वर्षीय ज्येष्ठ करतात अग्निदिव्य; १०५ धोंड एकत्रित करतात लईराईचे व्रत, महिलांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:20 AM2023-04-23T10:20:44+5:302023-04-23T10:20:55+5:30
केळीची व करमळीच्या पानावर हा फराळ वाढला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोलीः धनगरबांधवांच्या सावरधाटवाडीत अनेक वर्षे वास्तव्यास असलेले धनगरबांधव गेल्या अनेक वर्षांपासून देवी लईराईचे व्रत करतात. या ठिकाणी तब्बल १०५ व्रतस्थ धोंड असून पाच दिवस पूर्णपणे सोवळ्याचे पालन करतात. ठिकाणी मंडप घालून चुलीवर स्वयंपाक, फराळ केला जातो. केळीची व करमळीच्या पानावर हा फराळ वाढला जातो. सर्व व्रतस्थ एकत्रपणे कामाची जबाबदारी वाटून घेत पाच दिवसांचा उपवास करतात, असे यशवंत वरक, बाबू झोरे, जानू झोरे, जना वरक यांनी सांगितले.
पासष्ट वर्षे धोंड व्रत
सावरघाट येथे गेली सुमारे पासष्ट वर्षे देवीचे धोंड म्हणून अग्निदिव्य साकारणाऱ्या जानू झोरे (वय ९०) गंगाराम वरक (८०), भागो वरक (९०) मधू झोरे (८२) हे आजही तितक्याच उत्साहाने व्रत करतात.
पूर्वीचा काळ होता खूप कठीण
पूर्वीचा काळ खूपच कठीण होता. आम्ही झाडाखाली व्रत करायचो. चालत शिरगावला जायचो. आज परिस्थिती सुधारलेली आहे, अनेक सोयी आहेत. आम्ही सातत्याने व्रत करीत आहोत, असे ज्येष्ठ धोंडांनी सांगितले.
वेगळीच अनुभूती: जानू झोरे
सावरधाट, धनगरवाडीत ही मंडळी आनंदाने पाच दिवस एकत्र राहतात. या ठिकाणी मंदिर सभागृह आहे, त्या ठिकाणी वास्तव्य करतात. मंडप घालून सर्व सोवळ्याने फराळ करतात. पाच दिवस वेगळीच अनुभूती येत असते, असे जानू झोरे यांनी सांगितले.
युवकही करतात व्रत
या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात रानावनात भटकंती करून आमच्या समाजाने ही परंपरा आजही जोपासलेली आहे. पारंपरिक शेळी पालन, दूध व्यवसाय व इतर शेतीची कामे कमी होत आहेत. त्याही परिस्थितीत आम्ही एकत्र असून व्रत सुरूच ठेवले. अनेक युवक व्रत करण्यास पुढे येत असल्याचे झिलू वरक यांनी सांगितले.
रविवारी 'व्हडले जेवण'
या ठिकाणी वर्गणी काढून निधी गोळा करून ही मंडळी उत्सव करतात. रविवारी 'व्हडले जेवण', असते त्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होतो.
महिलाही करतात अग्निदिव्य : उज्ज्वला ताटे
महिला धोंडसुद्धा व्रत करून अग्निदिव्य करतात.
उज्ज्वला ताटे या महिला गेली पंचवीस वर्षे व्रत करतात. अग्निदिव्य दरवर्षी साकारतात. हा अनुभव विलक्षण असतो, असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"