गोव्यातील महामार्ग कामातील अडथळ्यांबाबत नितीन गडकरी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 07:27 PM2018-06-11T19:27:48+5:302018-06-11T19:27:48+5:30
राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली.
पणजी : राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्यासह काही अभियंत्यांना गडकरी यांनी फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री गडकरी यांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी बैठक घेतली. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाशीसंबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. गोव्यातील बांधकाम खात्याचे अभियंतेही उपस्थित होते. देशभरातील सातशे प्रकल्पांच्या कामाचा आढावा यावेळी घेतला गेला.
गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या रुंदीकरणाला काही आमदार व काही लोक विरोध करत आहेत. यामुळे अडथळे येत आहेत. या शिवायही काही प्रक्रिया जेवढय़ा वेगात व्हायला हव्यात तेवढ्या वेगाने त्या झालेल्या नाहीत, यामुळे मंत्री गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली. पर्वरी, वास्कोतील कामांबाबत गडकरी यांनी प्रधान मुख्य अभियंते पार्सेकर यांना बरेच प्रश्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने बैठकीनंतर जे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे, त्यातही गडकरी यांच्या नाराजीचा उल्लेख करण्यात आला आहे.
राज्यात सध्या पत्रदेवी ते करासवाडा हे 634.32 कोटी रुपयांचे काम सुरू आहे. करासवाडा ते बांबोळी हे 852.67 कोटींचे काम सुरू आहे. ढवळी बायपास-71.95 कोटी, खांडेपार पुल-355.44 कोटी, मडगाव पश्चिम बायपास- 274.01 कोटी, काणकोण बायपास- 290.59 कोटी, जुवारी पुल सुमारे अडिच हजार कोटी अशा प्रकारे राज्यात कामे सुरू आहेत. मात्र काही कामे वेळेत होत नसल्याने व काही कामांचा वेग संथ असल्याने गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
देशभरातील एकूण 70 प्रकल्पांपैकी 30 प्रकल्पांचे काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण होणार आहे. मंत्री गडकरी यांनी प्रत्येक प्रकल्पाच्या कामाचे बारकाईने विश्लेषण केले. 27 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जे 2015 पूर्वी देण्यात आले आहे, त्याही विकासकांना तथा कंत्रटदार कंपन्यांना काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रलयाने 2018 हे साल बांधकाम वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी सर्व संबंधितांना केल्या.