नितीन गडकरींची विश्वजीत राणे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 09:33 AM2024-07-13T09:33:22+5:302024-07-13T09:35:49+5:30
दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये गडकरींचा मुक्काम होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी काल, शुक्रवारी स्वतंत्रपणे भेट घेतली. विविध विषयांवर त्यावेळी चर्चा झाली. सत्तरी तालुक्यातील केरी येथील बायपासचे काम करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली व गडकरी यांनी हे काम करण्याची ग्वाही विश्वजीत राणे यांना दिली आहे.
दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये गडकरींचा मुक्काम होता. तिथे भेटण्यासाठी गडकरी यांनी विश्वजीत यांना वेळ दिली होती. विश्वजीत राणे यांनी तिथे गडकरी यांची भेट घेऊन बराचवेळ चर्चा केली. राजकीय व अन्य विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
केरी-सत्तरी येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने चोर्ला भागात जातात. तिथून ही वाहने बेळगावला जातात. केरीतील रस्ते अरुंद आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. काहीवेळा ट्रक बंद होऊन रस्त्याच्या बाजूला तसेच राहतात. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी बायपास रस्ता मंत्री राणे यांनी सूचवला आहे. हा भाग पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मतदारसंघात येतो.
मंत्री विश्वजीत राणे यांनी 'लोकमत'ला सांगितले की, गडकरी यांनी बायपास मार्ग बांधण्यास अनुकूलता दर्शवली आहे. बायपासचे काम झाल्यानंतर वाहतूक समस्येवर तोडगा निघेल.