सुविधा पुरवण्यात तडजोड नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 10:25 AM2024-05-10T10:25:12+5:302024-05-10T10:25:34+5:30
खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ७५० विद्यार्थी शिकत आहेत. चांगली पटसंख्या आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण पाहिजे. सुविधा पुरवण्यासाठी मी कुठेच तडजोड करणार नाही, असे उद्गगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दुरुस्ती कामाची पाहणी करताना काढले.
आमदार तथा मंत्री गोविंद गावडे, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संदीप गावडे, उप अभियंते बी. आर. प्रमोद, कनिष्ठ अभियंते रमेश मडकईकर, प्राचार्य अँटोनियो ब्रागांझ पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण सावंत व अन्य पालक उपस्थित होते.
यावेळी स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, मी पुढील ५० वर्षांची दूरदृष्टी ठेवूनच सर्व सुविधांनी युक्त अशी एक अत्याधुनिक पद्धतीची इमारत व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्याकडे या आधीच प्रस्ताव दिलेला आहे.
खांडोळा महाविद्यालयाची इमारत उभारण्यापूर्वी उच्च माध्यमिक इमारत उभारणे अत्यंत गरजेचे होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही इमारत बांधण्यास थोडा विलंब झाला. त्यासाठी मी पालकांची दिलगिरी व्यक्त करतो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री व मंत्री गावडे यांचे पालक-शिक्षक संघाच्या वतीने आभार मानतो, असे नारायण सावंत यांनी सांगितले.
विद्यालयाचे काम युद्ध पातळीवर
सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून सध्या दोन जुन्या इमारतीचे काम आम्ही हाती घेतले असून त्यांचे काम युद्ध पातळीवर चालू असून येत्या २५ मे पर्यंत ते काम सर्वार्थाने पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगले वर्ग, वाचनालय, प्रयोगशाळा, स्टाफ रूम, कॅन्टीन, टॉयलेट, बसची व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी गेट ते विद्यालयापर्यंत चांगला फुटपाथ ट्रॅक यांची चांगली व्यवस्था करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.