जमीन, घरे, मंदिरांना कोणताही धोका नाही! भोमवासीयांना मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 09:42 AM2023-08-21T09:42:28+5:302023-08-21T09:43:15+5:30
बगलमार्ग नेमका कोठून हवा, हे आधी स्पष्ट करावे, असे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: भोम येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना लोकांची एक इंचही जमीन जाणार नाही. तसेच कोणत्याही मंदिराला तसेच लागवडीखालील क्षेत्राला धक्का पोहोचणार नाही, अशी ग्वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी भोमवासीयांना दिली.
यावेळी त्यांनी बगलमार्ग नेमका कोठून हवा, हे आधी स्पष्ट करावे, असे आवाहन केले. तसेच महामार्गाचे काम करत असताना वेळप्रसंगी तुमच्यासोबत उभे राहून आंदोलन करेन, असे ठोस आश्वासनही मंत्री गावडे यांनी दिले.
गेल्या काही वर्षांपासून भोम येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावरून आंदोलने सुरू आहेत. या प्रश्नावर ग्रामस्थांची बाजू ऐकून घेण्यासाठी रविवारी मंत्री गावडे यांनी भोमीमधील सातेरी मंडपात बैठक घेतली. यावेळी मंत्री गावडे म्हणाले, या विषयावरून काहीजण राजकारण करू लागले आहेत. सर्वप्रथम ते बंद होणे गरजेचे आहे. या प्रकल्पात लोकांच्या जमिनी जाणार म्हणून काहीजणांना भीती वाटते, ती भीती मुळात चुकीची आहे. या संदर्भात लोकांना अधिक माहिती मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरणीच्या तज्ज्ञांना पुन्हा बोलावून वस्तुस्थिती सांगितली जाईल असे गावडे म्हणाले.
काळ कपडे घालून निषेध
रविवारी सातेरी मंडपात चर्चेसाठी आलेल्या अनेक भोमवासीयांनी काळे कपडे परिधान केले होते. या बैठकीला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रकल्पाच्या कामाला विरोध करणारे फलक घेऊन आलेल्या ग्रामस्थांनी निषेधार्थ घोषणाही दिल्या. पोलिस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.
धक्काबुक्कीने बैठकीला सुरुवात
भोमवासीयांसाठी ही बैठक बोलावण्यात आली असताना बाहेरचे लोक इथे काय करतायेत? असा प्रश्न एकाने उपस्थित करताच गोंधळ उडाला. बाहेरचे कोण? यावरून प्रकरण धक्काबुक्कीवर गेले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. यावेळी लोकांच्या वतीने संजय नाईक यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली.
आम्हाला लेखी द्या
आतापर्यंत सरकारने केवळ आश्वासनेच दिली आहेत. यापुढे जे काही सरकारला सांगायचे आहे ते लेखी स्वरूपातच आमच्यासमोर मांडावे. बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी ग्रामस्थांना आव्हान देत राष्ट्रीय महामार्ग सरकारला हवा तिथूनच होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्टता आणावी, अशी मागणी भोमवासीयांनी केली.