विश्वजित राणे यांच्याशी वाद नाहीच, ते आमचेच: प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2024 09:25 AM2024-10-02T09:25:29+5:302024-10-02T09:26:14+5:30
'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांना दिल्ली भेटीबाबत विचारले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: एखाद्या कुटूंबात एकत्र काम करताना रुसवे-फुगवे वगैरे असतातच. पण त्याचा अर्थ आपला वाद आहे, असा होत नाही. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याशी माझा वाद नाही, आमचे संबंध व नाते चांगले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.
'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांना काल रात्री दिल्ली भेटीबाबत विचारले त्यावेळी मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले की, नवे काहीच नाही. मंत्री राणे व माझ्यात वाद नाही. सरकार म्हणजे एक कुटूंब आहे. एकाच कुटुंबात आम्ही काम करतो. काम करताना किंचित मतभिन्नता किंवा थोडे रुसवे-फुगवे वगैरे असतात पण याचा अर्थ संघर्ष किंवा वाद आहे, असा होत नाही. माध्यमातून तसे आले असले तरी प्रत्यक्षात तसे काहीच नाही. मंत्री राणे यांच्याशी व्यक्तीगत स्तरावर माझे नाते चांगले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की दिल्लीतील बैठकीवेळी आमच्यात चर्चा झालीच पण बैठकीपूर्वी देखील आम्ही नड्डा यांच्या घरी एकत्र बसलो होतो. त्यावेळीही आम्ही एकमेकांशी चांगले बोललो. बैठकीनंतरही आम्ही एकमेकांना भेटून चांगले बोललो, त्यामुळे आमच्यात कटुता किंवा संघर्ष वगैरे काही नाही. आमचा नियमितपणे संवाद होतोय. उलट विश्वजित हे माझे शेजारी देखील आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांचा साखळी मतदारसंघ हा सत्तरी तालुक्याचा शेजारी आहे. शिवाय साखळीतच राणे यांचे निवासस्थान असल्याने त्या अर्थानेही विश्वजित हे शेजारी ठरतात. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील बैठकीविषयी जास्त माहिती उघड केली नाही. मुख्यमंत्र्यांनी विश्वजित राणे यांच्याबाबत कुठेच कोणते विरोधी विधान केलेले नाही. काल देखील त्यांनी कुणालाच कोणती प्रतिक्रिया दिली नाही, ते शांतपणे स्थिती पाहत आहेत. 'लोकमत'ने नोकऱ्यांबाबत विचारले असता, कर्मचारी भरती आयोगाचे काम आता खूप पुढे पोहचले आहे, एवढेच ते म्हणाले.