विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:49 AM2023-06-20T08:49:24+5:302023-06-20T08:50:37+5:30

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती.

no entry for students kadamba held hands due to shortage of buses | विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कदंब बसेस कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे. नवीन बसगाड्या मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती. मात्र, ही व्यवस्था यंदा कोलमडली आहे. कारण यंदा बसगाड्यांचा तुटवडा असल्याचे कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीही बसमध्ये घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारकडून अतिरिक्त बसगाड्या महामंडळाला दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची सोय केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

यंदा बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांसाठीची योजना कोलमडून पडल्याची कबुली कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जुलै महिन्यात त्या मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. निदान आणखी १०० बसगाड्या मिळाल्या त विद्यार्थ्यांसाठीची योजना पुन्हा सुरळीत होऊ शकते, असे ते म्हणाले. 

नव्या बसेसची प्रतीक्षा

नवीन बसगाड्या येणार असल्याच सरकारने म्हटले असले तरी त्या केव्हा येणार, याबद्दल महामंडळाचे अधिकारीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाहीत. त्यामुळे या बाबतीत अनिश्चितता आणि गैरसोय कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्य प्रवासाला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

पास प्रक्रिया बंद

योजनाच कोलमडल्यामुळे नवीन पास बनविण्याचे काम महामंडळाने थांबवले आहे. त्यामुळे पास नसलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही, अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कदंब महामंडळाचे काही बसचालक विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन पासची सक्ती करीत नाहीत, हा विद्यार्थ्यांना दिलासा आहे.

या योजनेची सुरुवात करून कदंब महामंडळाने पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. सकाळच्या वेळी शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची आणि नंतर शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी सोडण्याची व्यवस्था केली होती. मधल्या काळात या बसगाड्या आपल्या नेमून दिलेल्या मार्गावर धावू शकतात. अशी ही योजना होती. वार्षिक शुल्क आकारून त्यासाठी विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत होते.

 

Web Title: no entry for students kadamba held hands due to shortage of buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा