कला अकादमीच्या कामात कोणत्याच त्रुटी ठेवल्या नाहीत: गोविंद गावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 11:45 AM2024-07-30T11:45:58+5:302024-07-30T11:47:01+5:30

जूनपासून आतापर्यंत पावसातही ९० कार्यक्रम

no error has been left in the work of kala academy said govind gawde in vidhan sabha | कला अकादमीच्या कामात कोणत्याच त्रुटी ठेवल्या नाहीत: गोविंद गावडे 

कला अकादमीच्या कामात कोणत्याच त्रुटी ठेवल्या नाहीत: गोविंद गावडे 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः कला अकादमीच्या नूतनीकरणात कोणत्याही त्रुटी ठेवलेल्या नाहीत. जूनपासून आतापर्यंत भर पावसातही ९० कार्यक्रम झाले आहेत. परंतु कोणीही साऊंड सिस्टमबद्दल तक्रार केलेली नाही, असा दावा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल विधानसभेत केला.

कला व संस्कृती, क्रीडा खाते व ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या अनुदान मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. बांधकाम खात्याकडे कामांची यादी दिलेली असून कला अकादमीचे कोणतेही काम अर्धवट ठेवले जाणार नाही, असेही मंत्री गावडे म्हणाले.

विरोधकांचा समाचार घेताना गावडे म्हणाले की, काहीजण चार आण्याच्या राजकारणासाठी कला अकादमीचा वापर करत आहेत. या वस्तूच्या बाबतीत भ्रष्टाचाराचा वगैरे आरोप करताना निदान वास्तूचे पावित्र्य तरी सांभाळा. कला अकादमीची वास्तू वाळूच्या पट्ट्यावर बांधलेली आहे. कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहाची बुनियाद नदीच्या सपाटीपासून केवळ अडीच मीटरखाली आहे. १९९० साली या वास्तूच्या शास्त्रीय पद्धतीने दुरुस्तीचा विषय पुढे आला. तेव्हा चार्लस कुरैय्या फाउंडेशन कोणताही उपाय सुचवू शकले नाही. कला अकादमी मोठी करण्यात कलाकारांचे योगदान आहे. या फाउंडेशनचे काडीचेही योगदान नाही, असे मी ठामपणे म्हणू शकतो. कला आणि संस्कृती विभागाने कला आणि संस्कृती जतन करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी ६०० गट आणि संस्थांना आर्थिक पाठबळ दिले आहे. प्रत्येक सरकारी आणि अनुदानित शाळेत संगीत केंद्रे उघडली. मांड संस्कृती योजनेंतर्गत आवश्यक संगीत वाद्ये पुरवली आहेत. २५ भजनी मंडळांना संगीत वाद्ये दिली आहेत.

ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत ३,७२५ स्वयंसाहाय्य गट तयार केले गेले आहेत. १९ कोटी ८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. १५,७५६ सदस्यांना लाभ झाला. ग्रामीण भागात सेल्फ हेल्प गटांच्या माध्यमातून विविध महिला व्यवसायाकडे वळलेल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे आमचे कर्तव्य आहे. कृत्रिम फुले, काथ्याच्या बेंगा, चिकण मातीच्या वस्तू आधी बनवून त्या विकत असतात. या ग्रुपना 'लखपती' बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण व समुपदेशनही केले जाईल. पंतप्रधान अन्नपूर्णा योजनेंतर्गत १२५ स्वयंसहाय्य गटांना पॅनेल करण्यात आले आहे, ते राज्यभरात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्टीन चालवत आहेत, असेही गावडे म्हणाले.

राज्यभरातील रवींद्र भवनांचे नूतनीकरण केले जाईल. सांगे रवींद्र भवनसाठी सल्लागार नेमलेला आहे. जमीन मिळाल्यानंतर बार्देशमधील रवींद भवनचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लागेल. तालुक्यातील आमदारांनी पुढाकार घेऊन जमीन सुचवावी, असे गावडे म्हणाले. गोवा बाजार' इमारतीसाठी दोन महिन्यांत निविदा काढल्या जातील त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. डिझाइन आणि इतर गोष्टींसाठी सल्लागार नियुक्त केला जाईल, असे मंत्री गावडे यांनी जाहीर केले.

ग्रंथालय धोरण अंतिम टप्प्यात

ग्रंथालय धोरण अंतिम टप्प्यात आहे. सर्वांच्या सूचनांचा विचार करून मंत्रिमंडळ मंजुरीनंतर धोरण जाहीर करू. देशातील है पहिले ग्रंथालय धोरण ठरेल. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यात ७८ ग्रंथालये स्थापन करण्यात येणार आहेत. अंतर्गत भागांना सेवा देण्यासाठी फिरती वाचनालये सुरू केली जातील, ज्याचा फायदा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.

क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

राज्यात क्रीडा विद्यापीठ तसेच क्रीडा विज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढील १५ ते २० वर्षांच्या कालावधी नजरेसमोर ठेवून आमचा विचार चालू आहे. ५० सरकारी व खाजगी शाळा निवडून विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आयक्यू तपासून त्यांना खेळांमध्ये निपुण करू, असे गावडे क्रीडा खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले.

गावडेंच्या कार्यालयात आमदाराचे शिफारसपत्र चालत नाही : काब्राल

आमदार नीलेश काब्राल यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात आमदारांचे शिफारसपत्र चालत नाही का?, असा सवाल केला. माझ्या मतदारसंघात एक ७५ वर्षीय तियात्र कलाकार आहे. त्याला कला गौरव पुरस्कार मिळावा यासाठी गेली काही वर्षे मी त्याच्या नावाची शिफारस करत आलो आहे, पण बहुदा मंत्री गावडे यांच्या कार्यालयात आमदाराचे शिफारस पत्र चालत नसावे. वृद्ध कलाकारांना ते हयात असताना पुरस्कार वगैरे मिळाले तर ते चांगले असते.

 

Web Title: no error has been left in the work of kala academy said govind gawde in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.